दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद : केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर चंदगडवासियांचीही पसंती : कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी
सुशांत कुरंगी /बेळगाव
परदेशात शिक्षण, व्यवसाय, नोकरी आणि पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पारपत्र (पासपोर्ट) काढणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. पासपोर्ट हा परदेशी जाण्याचा परवाना असून देशाचे नागरिक असल्याचे एक ओळखपत्रही आहे. त्यामुळे बेळगावमधील पासपोर्ट सेवा केंद्रातून केवळ सहा महिन्यात 10,800 हून अधिक नागरिकांनी पासपोर्ट काढले आहेत. पोस्ट कार्यालयाच्या सहकार्याने बेळगावमधील मुख्य पोस्ट कार्यालयात फेब्रुवारी 2018 मध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले. त्यापूर्वी हुबळी येथे पासपोर्ट कार्यालय होते. बेळगावच्या नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी शंभर किलोमीटरवरील हुबळी येथे जाऊन पासपोर्ट काढावा लागत होता. परंतु, तत्कालिन विदेश मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या प्रयत्नांमुळे बेळगावमध्ये पोस्ट पासपोर्ट कार्यालय सुरू झाले.
पासपोर्टसाठी अर्ज केलेल्या नागरिकांच्या कागदपत्रांची छाननी पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये केली जाते. त्याचबरोबर संबंधित व्यक्तीचे छायाचित्रही घेतले जाते. बेळगाव शहर व परिसरातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जात असल्यामुळे पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. केवळ शिक्षणच नाही तर उद्योग, व्यवसाय, नोकरी व पर्यटनासाठी अनेक जण परदेशात जात असतात. बेळगावमधील शेकडो नागरिक दुबई, अमेरिका, रशिया, लंडन, बँकॉक, थायलंड, सिंगापूर या ठिकाणी स्थायिक असल्यामुळे परिवाराची भेट घेण्यासाठी त्यांची ये-जा असते. पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अपॉईंटमेंट तारीख व वेळ दिली जाते. बेळगावमध्ये सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू असते. पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यापासून दररोज 25 ते 40 नागरिकांना अपॉईंटमेंट दिली जात होती. परंतु, नागरिकांचा प्रतिसाद पाहता अपॉईंटमेंटची संख्या प्रतिदिन 80 ते 90 पर्यंत पोहोचली आहे. यापेक्षाही अधिक अपॉईंटमेंट दिली जाऊ शकते. परंतु, कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या अडथळा ठरत आहे.
कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या
पोस्ट कार्यालयाच्या सहकार्याने कॅम्प येथील पोस्टमन सर्कल (अंबा भुवन) येथील मुख्य पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाले. तेव्हापासून या ठिकाणी दोनच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी चार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. कर्मचाऱ्यांची संख्या वाढविल्यास नागरिकांना लवकर अपॉईंटमेंट मिळू शकते. सध्या पासपोर्टसाठी दहा ते बारा दिवसांचे ‘वेटिंग’ लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी केली जात आहे. जानेवारी ते जून 2023 या सहा महिन्यांच्या कालावधीत 10,800 च्या आसपास नागरिकांनी पासपोर्टसाठी कागदपत्रांची पडताळणी करून घेतली आहे. महिन्याला 1800 ते 1900 नागरिक पासपोर्टची पडताळणी करून घेतात. बेळगावसह जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी पासपोर्ट काढण्यासाठी दाखल होत असतात. केवळ बेळगावच नाही तर चंदगडमधीलही नागरिक या ठिकाणी पासपोर्ट काढून घेत आहेत.
असा काढा पासपोर्ट
पासपोर्ट काढण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. किचकट असणारी ही प्रक्रिया सुलभ झाली आहे. www.passportindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येऊ शकतो. अर्ज करणे अतिशय सुलभ असून आधारकार्ड, पॅनकार्ड, दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. पासपोर्ट सेवा केंद्रात कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या परिसरातील पोलीस स्थानकात अर्ज पाठविला जातो. अर्जदार कोणत्या गुन्ह्यात सहभागी आहे का? याची पडताळणी पोलिसांकडून केली जाते. त्यानंतरच पासपोर्ट उपलब्ध करून दिला जातो.
भारतीय पासपोर्टची वाढली ‘किंमत’
परदेशात राबणाऱ्या भारतीयांनी आपली प्रामाणिक सेवा दिली आहे. परिणामी जागतिक स्तरावरील 199 देशांच्या पासपोर्ट क्रमवारीत 87 व्या स्थानावर असलेल्या भारतीय पासपोर्टच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. आता हा पासपोर्ट 81 व्या स्थानावर आला असून शेजारी देश पाकिस्तानची मात्र 101 व्या स्थानावर घसरण झाली आहे.