ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी अडवल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री समृद्धी महामार्गावरील सिन्नर टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणात मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री अमित ठाकरे समृद्धी महामार्गावरून जाताना सिन्नरच्या टोल नाक्यावर त्यांची गाडी अडविण्यात आली. त्याचा राग मनात ठेवत नाशिकचे मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह 12 ते 15 पदाधिकाऱ्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली होती. समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीने याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तोडफोडीमध्ये जवळपास 5 लाखांचं नुकसान झाल्याचा दावा समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
टोल प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात 15 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर वावी पोलिसांनी 14 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यामधील आठ जणांना अटक करण्यात आली आहे. इतर 4 ते 6 जणांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी आणि राज्य कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.