बेळगाव : जादुई आवाजाची नैसर्गिक देणगी लाभलेल्या गायक जोडीने बेळगावकर तरुणाईला थिरकायला लावले. हिंदी चित्रपट गीतांतील आघाडीचे गायक साचेत व परंपरा यांनी अप्रतिम अशी बॉलिवूडमधील गाणी सादर केली. एकाहून एक सरस गीते सादर करून त्यांनी रसिकांची मने जिंकली.
भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या हीरक महोत्सवानिमित्त मंगळवारी बॉलिवूडमधील आघाडीचे गायक साचेत व परंपरा यांच्या धमाकेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्यांदाच ही गायक कलाकार जोडी बेळगावला आल्याने रसिकांनीही तुफान प्रतिसाद दिला. त्यांच्या गाजलेल्या गीतांची बेळगावमध्ये धूम पहायला मिळली. प्रारंभी स्वाती जोग यांनी प्रास्ताविक करत भरतेश शिक्षण संस्थेचा प्रवास उलगडला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी साचेत व परंपरा यांचे स्वागत केले.
‘एक फकिरा’ गाण्याने लावले वेड
साचेत-परंपरा यांनी एकाहून एक अशी सरस गाणी सादर केली. कबीर सिंग चित्रपटातील बेखयाली या गाण्याला तरुणाईने मोबाईल टॉर्चची साथ दिली. त्यानंतर हम्मा, एक फकिरा, मुकाबला या गाण्यांनी रसिकांना थिरकायला लावले. भरतेश कॉलेज परिसरातील मैदान विद्यार्थी व मान्यवरांनी खचाखच भरले होते.