वृत्तसंस्था/ यॉर्कशायर (ब्रिटन)
2022 युरो चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी येथील न्यूयॉर्क स्टेडियमवर झालेल्या सामन्यात फ्रान्सने बेल्जियमचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
हा सामना शेवटपर्यंत अटीतटीचा झाला. मात्र, सामन्यातील कालावधीत फ्रान्सच्या हद्दीमध्ये 60 टक्के चेंडू वावरत होता. फ्रान्सकडून एकूण 7 फटके गोलपोस्टच्या दिशेने मारले गेले पण त्यांना अधिक गोल नोंदविता आले नाहीत. फ्रान्सच्या तुलनेत बेल्जियमचा संघ कमकुवत वाटत होता. या सामन्यात पहिल्या सहा मिनिटातच फ्रान्सचे खाते के. डायनीने उघडले. डायनीने सहा यार्ड अंतरावरून अचूक गोल केला. 15 व्या मिनिटाला डायनीला दुसरा गोल करण्याची संधी मिळाली पण बेल्जियमची गोलरक्षक इव्हेरार्दने डायनीचा हा फटका अचूकपणे थोपविला. डाव्या बगलेतून फ्रान्सने बेल्जियमच्या बचाव फळीवर आपल्या चढायानी दडपण आणले होते.
सामन्यातील 17 व्या मिनिटाला फ्रान्स संघातील खेळाडू केटोटो जखमी झाल्याने तिला मैदान सोडावे लागले. फ्रान्स संघाला हा बसलेला मोठा धक्का होता. केटोटोच्या जागी बदली खेळाडू ओलेमाटा सारला मैदानात उतरवण्यात आले. 36 व्या मिनिटाला बेल्जियमने फ्रान्सशी बरोबरी साधली. जेनाईस केमनने बेल्जियमचा हा गोल नोंदविला. बेल्जियम संघाला ही बरोबरी अधिक वेळ राखता आली नाही. 41 व्या मिनिटाला फ्रान्सच्या बेथीने पेनल्टीवर हेडरद्वारे दुसरा आणि निर्णायक गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत फ्रान्सने बेल्जियमवर 2-1 अशी आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात बेल्जियमने वेगवान खेळावर भर देत गोल करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपशय आले. फ्रान्सने अखेर हा सामना 2-1 असा जिंकून बेल्जियमचे आव्हान संपुष्टात आणले. ड गटातील गुरुवारचा हा शेवटचा सामना होता. आता फ्रान्सचा पुढील सामना आईसलँडबरोबर येत्या मंगळवारी खेळवला जाणार आहे.