वृत्तसंस्था/ इंदोर
2022-23 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे रविवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात बंगालने मध्यप्रदेशचा 306 धावांनी दणदणीत पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता कोलकाता येथे 16 फेब्रुवारीपासून बंगाल आणि सौराष्ट्र यांच्यात ईडन गार्डन्स मैदानावर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात बंगालच्या आकाशदीपला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या दुसऱ्या सामन्यात बंगालने पहिल्या डावात 438 धावा जमवल्यानंतर मध्यप्रदेशचा पहिला 170 धावात आटोपला. बंगालने पहिल्या डावातच 268 धावांची भक्कम आघाडी घेतली. बंगालचा दुसरा डाव 119.4 षटकात 279 धावांत आटोपला. बंगालच्या दुसऱ्या डावात मुजुमदारने 7 चौकारासह 80 पी. प्रामाणिकने 5 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 60, घरमीने 1 षटकार आणि 3 चौकारासह 41, शहबाज अहमदने 2 चौकारासह 29, ईश्वरनने 2 चौकारासह 17 धावा जमवल्या. मध्यप्रदेशच्या सारांश जैनने 103 धावात 6 तर कुमार कार्तिकेने 63 धावात 3 गडी बाद केले. बंगालने मध्यप्रदेशला निर्णाय विजयासाठी 548 धावांचे कठीण आव्हान दिले. पण मध्यप्रदेशचा दुसरा डाव 39.5 षटकात 241 धावात आटोपल्याने बंगालने हा सामना 306 धावांनी जिंकून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. मध्यप्रदेशच्या दुसऱ्या डावात रजत पाटीदारने 4 षटकार आणि 2 चौकारासह 52, यश दुबेने 3 चौकारासह 30, शुभम शर्माने 1 षटकार आणि 1 चौकारासह 24, कर्णधार आदित्य श्रीवास्तवने 4 चौकारासह 29 तर अनुभव अगरवालने 12 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 30 धावा जमवल्या. बंगालतर्फे पी. प्रामाणिकने 51 धावात 5 तर मुकेशकुमारने 2 तसेच शहबाज अहमद आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : बंगाल प. डाव सर्व बाद 438, मध्यप्रदेश प. डाव सर्व बाद 170, बंगाल दु. डाव 119.4 षटकात सर्वबाद 279, मध्यप्रदेश दु. डाव 39.5 षटकात सर्वबाद 241 (रजत पाटीदार 52, यश दुबे 30, श्रीवास्तव 29, अनुभव अगरवाल नाबाद 30, शुभम शर्मा 24, पी. प्रामाणिक 5-51, मुकेशकुमार 2-35, शहबाज अहमद 1-77, आकाशदीप 1-18).