सुमारे 2 लाख भाविकांनी घेतले देवीचे दर्शन : दिवसभरात कोट्यावधींची उलाढाल : यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त
वार्ताहर /दड्डी
‘चांगभलं’च्या गजरात भावेश्वरी देवीच्या यात्रेला सोमवार दि. 6 पासून भक्तिपूर्ण वातावरणात सुऊवात झाली. पहिल्या दिवशी 5 हजार भाविकांनी शस्त्र इंगळीचा लाभ घेतला. मंगळवारी सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी 2 लाख भाविकांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे मोदगा गाव भाविकांनी फुलून गेल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव, गोवा, कोकण महाराष्ट्रातून भाविक मिळेल त्या वाहनांनी मोदगा गावात दाखल होत आहेत. मंदिर परिसरात भाविक रांगेत दर्शन घेत आहेत. देवीच्या नावानं चांगभलंचा गजर व भंडाऱ्यांची उधळण करत देवीचे दर्शन घेतले जात आहे. त्यामुळे मंदिर परिसरात भंडाऱ्यांचा खच पडल्याचे दिसत आहे. यंदा बकऱ्यांच्या दरात कमालीची तेजी पहावयास मिळत असतानाही किमतीकडे लक्ष न देता त्याची खरेदी करण्यासाठी भाविकांनी कोणतीच कसर ठेवली नाही. मंदिर परिसरात विविध प्रकारचे स्टॉल थाटण्यात आले आहेत. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शुद्ध पाणी व 24 तास वीजपुरवठा करण्यात आल्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. मंगळवारी दिवसभरात कोट्यावधींची उलाढाल झाली. भाविकांसाठी वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.