चोरट्यांनी दानपेटीतील रकमेसह समई लांबविल्या
बेळगाव : बंबरगे येथील श्री जोतिबा मंदिरामधील दानपेटीसह समई व कलश चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर काकती पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. गावच्या बाहेर असलेल्या जोतिबा मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर तेथे असलेली दानपेटी फोडून चोरट्यांनी त्यामधील मोठी रक्कम लांबविली आहे. याचबरोबर 3 फूट उंचीच्या दोन समईदेखील चोरट्यांनी नेल्या आहेत. मूर्तीच्या बाजूला तांब्याची कळशी होती. जाताना तीही चोरट्यांनी घेऊन गेली. या घटनेमुळे बंबरगे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मंदिरातील दानपेटीमधील रक्कम कोल्हापूर येथील श्री जोतिबा यात्रोत्सवावेळी मोजली जाते. जमा झालेली रक्कम यात्रेसाठी खर्च केली जाते. यामुळे या दानपेटीमध्ये मोठी रक्कम जमा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी भाविक देवदर्शनासाठी गेले असताना ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर काकती पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली आहे. अशा चोरीच्या घटना वारंवार या परिसरात घडत आहेत. बंबरगे, कट्टनभावी, गुग्रेनहट्टी, होसूर या गावामध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी बंबरगे येथीलच विठ्ठल मंदिरातही चोरी झाली होती. तेव्हा पोलिसांनी अशा चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.