धर्मेंद्र शर्मा यांचा पत्ता कट
अजय देवगणचा चित्रपट ‘रनवे 34’ ओटीटीवर प्रदर्शित झाल्यावर त्याचे प्रचंड कौतुक झाले होते. अजय देवगणचा अभिनयच नव्हे तर त्याच्या दिग्दर्शकीय कौशल्याचे प्रेक्षकांनी कौतुक केले. चित्रपटाला मिळत असलेला हा प्रतिसाद पाहून अजयने स्वतःचा पुढील चित्रपट ‘भोला’चे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनयासह चित्रपटांचे दिग्दर्शनही करत राहणार असल्याचे त्याचे सांगणे आहे. अजयने आतापर्यंत 3 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘भोला’ हा तमिळ चित्रपट ‘कैथी’चा हिंदी रिमेक आहे. या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन आता अजय करणार आहे. पूर्वी याचे दिग्दर्शन धर्मेंद्र शर्मा करणार होता. परंतु अजयने ही जबाबदारी स्वतः पेलण्याचा निर्णय घेतला आहे. अजयने एक छायाचित्र शेअर करत ‘आता ऍक्शन म्हणण्याची वेळ पुन्हा आली आहे’ असे नमूद केले आहे.
चित्रपटात तब्बू नायिका
19 एप्रिल रोजी अजयने ‘भोला’ चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात अजयची नायिका म्हणून तब्बू झळकणार आहे. तब्बूसोबत अजय यापूर्वी दृश्यम, दे दे प्यार दे, विजयपथ या चित्रपटांमध्ये दिसून आला आहे. ‘भोला’ हा चित्रपट 30 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.