मृतांमध्ये मुलांचाही समावेश ः कुल्लू येथील दुर्घटना
शिमला / वृत्तसंस्था
हिमाचलच्या कुल्लूमध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. प्रवाशांची खासगी बस सैंज दरीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुलांचाही समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दुर्घटनेवेळी बसमध्ये 20 हून अधिक लोक होते, असे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर काही जखमींना गंभीर अवस्थेत दरीबाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कुल्लूमधील सैंज व्हॅलीमध्ये सकाळी 8.30 वाजता बस दरीत कोसळण्याची दुर्घटना घडली. बस कुल्लूहून सैंजकडे जात होती. या बसमध्ये शाळकरी मुले प्रवास करत होती. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्मयता जिल्हा आयुक्तांनी व्यक्त केली आहे. अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदत व बचावपथकाला घटनास्थळी पाठविण्यात आले. तथापि, पावसाळी वातावरणामुळे मदतकार्यात अडचणी येत होत्या. अपघातसमयी आम्हाला काय झाले, हेदेखील कळले नाही. रस्ता चिखलमय बनल्यामुळे बस मातीत घसरली. आम्हाला स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही, असे अपघातात जखमी झालेल्यांपैकी बस कंडक्टर गोपाल याने सांगितले.
केंद्र-राज्य सरकारकडून मदत
केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. त्याचवेळी राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये आणि जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर ज्यांना किरकोळ दुखापत झाली आहे, त्यांना तातडीने 15 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दुःखाच्या काळात मृतांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना असल्याचे पंतप्रधान म्हणाले. तसेच हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनीही अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आहे.