लोणावळा / प्रतिनिधी :
पुण्या-मुंबईसह राज्यभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले लोणावळा शहरातील भुशी धरण शनिवारी पहाटे ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यात बसून वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी सकाळपासून एकच गर्दी केली.
दरवर्षी लाखो पर्यटक लोणावळय़ात येत असतात व येथील विविध पॉईंट्ला भेट देत आपला आनंद द्विगुणित करतात. अर्थात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो, तो भुशी डॅम. शनिवारी धरण भरल्याची माहिती हा हा म्हणता सर्वत्र पसरली नि धरणाच्या पायऱ्यांवर बसून भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची एकच झुंबड उडाली. सोबत सहारा पुलासमोरील धबधबा व लायन्स पॉईंटही पर्यटकांनी गजबजून गेला.
मागील आठवडय़ात लोणावळय़ात पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने भुशी धरण पूर्ण क्षमतेने भरले. भुशी धरणासोबतच लायन्स पॉईंट, राजमाची गार्डन, सहारा पूल धबधबा, कार्ला, भाजे लेणी, तेथील धबधबा, पवना धरण परिसरात पर्यटकांची गर्दी केल्याचे दिसत आहे.