वृत्तसंस्था /नवी दिल्ली
गेल्या वर्षीच्या तुलनेत राष्ट्रीय राजकीय पक्षांना मिळणाऱया देणग्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येत आहे. 2020-2021 या वर्षात सर्व राष्ट्रीय राजकीय पक्षंाना मिळून मिळालेल्या देणग्यांचे प्रमाण त्याच्या मागच्या वर्षीच्या तुलनेत 41.49 टक्के कमी झाले आहे, असे एडीआर या संस्थेने स्पष्ट केले.
कोरोना उद्रेकामुळे अर्थव्यवस्था मंदावल्याने राजकीय पक्षांच्या देणग्यांमध्येही घट झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. भारतीय जनता पक्षाला 2019-2020 या कालावधीत 785.77 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. मात्र, आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये केवळ 477.54 कोटी रुपये मिळालेले आहे. ही घट 39.23 कोटी रुपयांची आहे. 2019-2020 मध्ये भारतीय जनता पक्षाला त्या मागच्या वर्षापेक्षा 5.88 टक्के देणग्या जास्त मिळाल्या होत्या.
काँग्रेस पक्षाच्या देणग्यांमध्येही 46.19 टक्के घट झाली आहे. 2019-2020 या आर्थिक वर्षात काँग्रेसला 139.01 कोटी रुपये मिळाले होते. मात्र, 2020-2021 या आर्थिक वर्षात या पक्षाला केवळ 74.52 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण राष्ट्रीय राजधानी दिल्लीचे आहे. दिल्लीतून 246 कोटी रुपयांच्या देणग्या देण्यात आल्या आहेत. तर त्या खालोखाल महाराष्ट्रातून 71.68 कोटी रुपये तर गुजरातमधून 47 कोटी रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली.
देशात सध्या भाजप, बसप, काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, टीएमसी, एनसीपी, आणि एनपीपी असे आठ राष्ट्रीय पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंद करण्यात आले आहेत. भाजपला एकंदर 1,100 कंपन्या आणि उद्योगांनी देणग्या दिल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ 146 देणगीदारांकडून देणग्या मिळाल्या आहेत. एडीआर ही संस्था वेळोवेळी राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांचे तपशील आपल्या अहवालातून लोकांसमोर ठेवत आलेली आहे.