200 बसेसची ऑर्डर : सदरच्या बस जम्मू काश्मीरमध्ये धावणार
नवी दिल्ली : टाटा समूह ही देशातील सर्वात जुनी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी आता इलेक्ट्रिक बसही बनवत आहे. आता 200 इलेक्ट्रिक बसेसच्या पुरवठय़ासाठी नुकतीच मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. या बसेस जम्मू-काश्मीरमध्ये धावणार असल्याची माहिती आहे.
टाटा मोटर्सने सांगितले की त्यांना 200 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाली आहे. या बसेस जम्मू आणि श्रीनगरमध्ये वापरल्या जाणार आहेत. सदरच्या निवेदनात म्हटले आहे की, या मुंबईस्थित वाहन कंपनीने जम्मू स्मार्टसिटी लिमिटेडच्या 200 इलेक्ट्रिक बसेसच्या निविदेसाठी यशस्वी बोली लावली आहे.
कराराचे काय?
जम्मू स्मार्ट सिटी लिमिटेडसोबत झालेल्या करारानुसार टाटा मोटर्स या बसेसचा पुरवठा करणार आहे. पुरवठय़ानंतर 12 वर्षांच्या कालावधीसाठी बसेसचे संचालन आणि देखभालदेखील करेल. टाटा मोटर्स स्मार्ट सिटी मोबिलिटी सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक असीम मुखोपाध्याय यावेळी म्हणाले, ‘इको-प्रेंडली सार्वजनिक वाहतूक ही काळाची गरज आहे आणि टाटा मोटर्सला जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रवाशांना सेवा देण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे.’
बस देशातील अनेक शहरांमध्ये कार्यरत
कंपनीने 2019 पासून इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा सुरू केला आहे. तेव्हापासून देशातील अनेक शहरांना 715 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या टाटा मोटर्सच्या 40 इलेक्ट्रिक बस धावत आहेत.