वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
रशियाप्रकरणी भारताच्या भूमिकेमुळे निराश अमेरिका आता भारतासोबत स्वतःचे संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अमेरिका संरक्षण क्षेत्रात भारतासोबत एक मोठा करार करणार आहे. भारताचे रशियाच्या शस्त्रास्त्रांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अमेरिका सैन्य सहाय्य पॅकेज तयार करत आहे.
विचाराधीन पॅकेज 500 कोटी डॉलर्सचे असू शकते. इस्रायल आणि इजिप्तनंतर भारत अमेरिकेकडून अशाप्राकरची मदत मिळविणारा सर्वात मोठा देश ठरणार आहे. या कराराची घोषणा कधी होणार किंवा यात कुठल्या शस्त्रास्त्रांना सामील केले जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाची भारताने निंदा पेलेली नाही, तरीही अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनाकडून भारताला एक दीर्घकालीन सुरक्षा भागीदार करण्यासाठी मोठा प्रयत्न करण्यात येत आहे. अमेरिका भारताचा एक विश्वसनीय भागीदार ठरू इच्छित आहे. भारताकडे सर्व आवश्यक सैन्य उपकरणे असतील हे सुनिश्चित करण्यासाठी बिडेन प्रशासन फ्रान्ससह अन्य देशांसोबत मिळून काम करत आहे. तर रशियावरील निर्भरता कमी करण्यासाठी भारताकडून पूर्वीच प्रयत्न सुरू झाले आहेत. भारताला लढाऊ विमाने, युद्धनौका आणि रणगाडे यासारखी प्रमुख शस्त्रास्त्रs कशाप्रकारे उपलब्ध करावीत याचा निर्णय अमेरिकेला घ्यावा लागणार आहे. अमेरिका यातील एखाद्या क्षेत्रात भारताला पूर्ण मदत करू इच्छितो असे अमेरिकेच्या एका अधिकाऱयाने म्हटले आहे.