जेएमएफसी न्यायालयासमोरील प्रकार : वकील-पक्षकारांना होतोय त्रास : समस्या सोडविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
न्यायालय म्हटले की धावपळ आणि गर्दी ही नित्याचीच. नाव पुकारल्यानंतर वकील व पक्षकारांची एकच धावपळ उडते. जिल्हा न्यायालयातून जेएमएफसी न्यायालयाकडे वारंवार यावे लागते. मात्र या धावपळ करण्याच्या ठिकाणी म्हणजे प्रवेशद्वारासमोरच दुचाकी पार्किंग केल्या जातात. ये-जा करण्यासाठीही वाट नसते. त्यामुळे वकीलवर्गाबरोबरच पक्षकारांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पार्किंगला शिस्त लावणे गरजेचे आहे. एक तर नाहक जेएमएफसीच्या आवारात इमारतींची उभारणी केली जात आहे. त्यामुळे पार्किंगला जागा कमी पडत आहे. त्यामुळे जेएमएफसी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच चारचाकी आणि दुचाकी पार्किंग केल्या जात आहेत. यातच पोलिसांची वाहने, न्यायाधीश आल्यानंतर प्रवेशद्वाराजवळच वाहने लावली जातात. त्यामुळे बऱयाचवेळा ये-जा करण्यासाठी वाटदेखील शिल्लक राहत नाही. त्यामुळे नेहमीच समस्या निर्माण होत आहे.
जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात काही दिवसांपूर्वी केवळ वकिलांच्या चारचाकी वाहनांनाच प्रवेश देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार काही दिवस कारवाई करण्यात आली. मात्र आता दुचाकींचेही प्रमाण वाढले आहे. न्यायालय सतत गजबजलेले असते. जेएमएफसी न्यायालयाचा आवार कमी झाला आहे. अनेक नवनव्या इमारतींमुळे पार्किंगला जागा कमी होत आहे. पूर्वीचे कॅन्टीन पाडविण्यात आले. मात्र त्यानंतर त्याची उभारणी करण्यात आली नाही. वास्तविक जर जागेचे योग्य सपाटीकरण करून नियोजन केले तर काही प्रमाणात पार्किंगची समस्या मिटू शकते, असे मत जाणकार वकिलांचे आहे.
बार असोसिएशनने आता याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या पार्किंगबाबत न्यायालयीन प्रशासनाकडेही पाठपुरावा करणे गरजेचे आहे. तेव्हा ही समस्या सोडविण्यासाठी बार असोसिएशनने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.