वार्ताहर /धामणे
महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार महादेव तुकाराम पाटील यांच्या प्रचारार्थ रविवार दि. 28 रोजी बाईक रॅली काढून झंझावाती प्रचार करण्यात आला. या बाईक रॅलीची सुरुवात धामणे येथील छत्रपती शिवाजी चौकातून शिवमूर्तीच्या पूजनाने करण्यात आली. पाटील गल्ली, कलमेश्वर गल्ली, कलमेश्वरनगर, नवी गल्ली, लक्ष्मी गल्ली, शहापूर गल्ली, बसवाण गल्ली फिरून कुरबरहट्टी येथील ब्रह्मलिंग मंदिर येथे ही रॅली पोहोचली. या ठिकाणी धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने ग्राम पंचायत सदस्य यल्लाप्पा रेमाण्णाचे यांनी उमेदवार महादेव पाटील यांचे स्वागत करून धामणे विभागातून आम्ही जास्तीत जास्त मतदान करू, असे आश्वासन दिले. या रॅलीत बेळगाव शहर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, युवा समितीचे नेते शुभम शेळके, पुंडलिक रेमाण्णाचे, पिराजी बाळेकुंद्री, प्रशांत रेमाण्णाचे व समितीचे शेकडो कार्यकर्ते बाईक रॅलीत सहभागी झाले होते. ही बाईक रॅली पुढे मासगौंडहट्टी, देवगणहट्टी, अवचारहट्टीहून मार्गस्थ झाली.