छंद देखील अजब गोष्ट आहे
लहान मुले असो किंवा प्रौढ प्रत्येकाला जन्मदिन साजरा करणे अत्यंत आवडत असते, परंतु अनेक लोक ही गोष्ट मान्य करण्यास संकोच करत असतात. अनेक लोक जन्मदिनाला नकारात्मक पद्धतीने पाहत असतात. जन्मदिन हा आनंदाचा नव्हे तर दुःखाचा दिवस आहे, कारण जन्मदिन आल्यावर जीवनातील एक वर्ष कमी झाल्याचे अशा लोकांचे मानणे असते. अशाच एका इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसरने स्वतःचा जन्मदिन अंत्यसंस्काराच्या थीमवर साजरा केला आहे.
कॅनडाच्या व्हँकुव्हर येथे राहणारी जेसिका लक्स इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर असून तिला हजारो लोक फॉलो करतात. अलिकडेच तिने स्वतःचा 30 वा जन्मदिन साजरा केला आहे. हा दिवस साजरा करण्याची तिची पद्धत अत्यंत विचित्र होती. या महिलेने जन्मदिनी घराला कुणीतरी मृत्युमुखी झाल्यासारखे सजविले होते आणि स्वतःच्या मागील वर्षाला निरोप देत प्रतीकात्मक अंत्यसंस्कार केले आहेत.
तिने काही छायाचित्रे आणि चित्रफिती शेअर करत अंत्यसंस्काराच्या थीमवर घराला कशाप्रकारे सजविण्यात आले हे दाखवून दिले आहे. घरात काळय़ा रंगाचे फुगे लावण्यात आले होते, त्यावर जेसिकाच्या 20 व्या वर्षाच्या आत्म्याला शांती मिळो’ असे लिहिलेले होते. तिने आणलेला केक देखील काळय़ा रंगाचा होता आणि त्यावर काळय़ा रंगाचे वटवाघूळ रेखाटण्यात आले होते. महिलेच्या पोस्टवर कॉमेंट करत अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आणि आश्चर्यही व्यक्त केले. अशाप्रकारचा वाढदिवस अजब असल्याचे एकाने म्हटले आहे.
जन्मदिन साजरा करण्याचा आनंद सर्वांना असतो, परंतु जगात अनेक ठिकाणी जन्मदिन साजरा करण्याच्या पद्धती अजब आहेत. डेन्मार्कमध्ये 25 व्या जन्मदिनी कुटुंबीय संबंधित व्यक्तीला दालचिनीने आंघोळ घालत असतात. 25 वर्षे होऊनही विवाह न केलेल्या व्यक्तीला ही एकप्रकारची शिक्षा असते.