आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि जेडी(एस) यांनी आपल्या कर्नाटकमधील युतीवर शिक्कामोर्तब केले आहे. यासंबंधीची माहीती भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी शुक्रवारी दिली. या युतीनुसार कर्नाटकातील लोकसभेच्या चार जागा जेडी(एस) ला देण्याचे अमित शाह यांनी मान्य केले आहे. जेडी(एस) सुप्रीमो एच.डी. देवेगौडा यांनी नुकतीच भाजपचे प्रमुख जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन भाजप आणि जेडी(एस) युतीचे संकेत दिले होते.
2019 मध्ये जेडीएसने काँग्रेसबरोबर युती केली होती. काँग्रेसच्या पाठींब्यावरच एचडी कुमारस्वामी सरकार स्थापन करून मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर काँग्रेसचे काही आमदार फुटल्याने हे सरकार कोसळले होते.
अधिक माहीतीनुसार कुमारस्वामी यांचा जेडीएस पक्ष मंड्या, हसन, तुमकुरू, चिकबल्लापूर आणि बेंगळूर ग्रामीण या जागासाठी इच्छूक असल्याचे सांगितले जात आहे. पण भाजपने त्यांना कोलार, हसन, मंड्या आणि बंगळूर ग्रामीण या चार जागांवर उमेदवारी देण्याचे मान्य केले आहे.
जेडीएस इंडिया या नविन आघाडीसोबत नाहीत त्याच प्रमाणे ते NDA सोबतही नाहीत. आपला पक्ष लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे विधान देवेगौडा यांनी काही दिवसापुर्वी केले होते. काँग्रेसचा एकेकाळचा सहयोगी असलेल्या जेडीएसला बेंगळूर येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत आमंत्रित करण्यात आले नव्हते. “कर्नाटकातील काही काँग्रेस नेत्यांना मी नको होतो. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार माझे चांगले मित्र आहेत पण काँग्रेसला मी नको असल्याने मला त्यांनी वगळले. ” अशी प्रतिक्रीय देवेगौडा यांनी दिली होती.