सीसीटीव्ही फुटेजद्वारे मिळाली माहिती ः पोलिसांकडून तपास सुरु
@ वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथील माकपच्या राज्य मुख्यालयाच्या भिंतींवर गुरुवारी रात्री उशिरा एक व्यक्ती बॉम्ब फेकत असतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये दुचाकीवरील एक व्यक्ती हे कृत्य करताना दिसून आला आहे. बॉम्ब कथितरित्या कार्यालयाच्या भिंतीवर आदळला आणि त्यानंतर त्याचा स्फोट झाला. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मोठय़ा संख्क्येत माकप कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर जमा झाले. पक्ष कार्यालयावर झालेल्या या हल्ल्याद्वारे युडीएफ प्रकरण चिघळविण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही याच्या विरोधात शांततेच्या मार्गाने निदर्शने करू असे उद्गार माकपच्या राज्य सचिवांनी म्हटले आहे.
पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून सध्या ती प्रारंभिक टप्प्यात असल्याची माहिती तिरुअनंतपुरमचे पोलीस आयुक्त जी. स्पर्जन कुमार यांनी दिली आहे. राज्याचे अर्थमंत्री के.एन. बालगोपाल यांनी या घटनेप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. केरळमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी पूर्वनियोजित प्रयत्नांतर्गत अशा घटना घडवून आणल्या जात आहेत. पोलीस आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवेल अशी अपेक्षा आहे. केरळच्या लोकांना या घटनेप्रकरणी शांततेच्या मार्गाने निदर्शने करण्याचे आवाहन करतो असे विधान बालगोपाल यांनी केले आहे.
माकप मुख्यालयावर काँग्रेसच्या गुंडांनी हल्ला केला आहे. त्यांनी मुख्यालयावर बॉम्ब फेकला आहे. आम्ही या हल्ल्याची निंदा करतो आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना याच्या विरोधात शांततेच्या मार्गाने निदर्शने करण्याचे आवाहन करत असल्याचे डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ए.ए. रहिम यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वायनाड येथील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. काँग्रेसने हा हल्ला एसएफआयने केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. याप्रकरणी एफएसआयच्या 19 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. विरोधी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफने हा हल्ला मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनीच घडवून आणल्याचा आरोप केला होता. राहुल गांधी सध्या वायनाड दौऱयावर आहेत.