नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने विदेशात प्रवास करणाऱयांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील फरकाचा नियम बदलला आहे. आता विदेशात जाऊ इच्छिणाऱया भारतीय नागरिकांना ते जात असलेल्या देशाच्या नियमानुसार बूस्टर डोस मिळू शकणार आहे. सध्या, 18 वर्षांवरील भारतीय नागरिकांसाठी दुसरा डोस आणि बूस्टर डोसमध्ये 9 महिन्यांचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. तरीही परदेशी जाणाऱया प्रवाशांसाठी बूस्टर डोस मार्गदर्शक तत्त्वे शिथिल करण्याचा निर्णय नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनच्या शिफारशींवर आधारित आहे. ही सुविधा लवकरच कोविन पोर्टलवरही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.