झिम्बाब्वेविरुद्ध विंडीजचा 6-447 धावांचा डोंगर, चंदरपॉलचे पहिले नाबाद द्विशतक, मवुताचे 5 बळी, झिम्बाब्वे 3 बाद 114
वृत्तसंस्था/ बुलावायो
सलामीवीर क्रेग ब्रेथवेट व तेजनरेन चंदरपॉल यांनी नोंदवलेल्या त्रिशतकी सलामीच्या बळावर विंडीजने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तिसऱया दिवशी 6 बाद 447 धावांवर पहिला डाव घोषित केला. ब्रेथवेटने 182 तर चंदरपॉलने नाबाद 207 धावांचे योगदान दिले. दिवसअखेर झिम्बाब्वेने पहिल्या डावात 41.4 षटकांत 3 बाद 114 धावा जमविल्या होत्या. इनोसंट 59 धावांवर खेळत आहे.
विंडीजने या सामन्यात प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर बेथवेट व चंदरपॉल यांनी दमदार फलंदाजी करीत पहिल्या गडय़ासाठी तब्बल 336 धावांची विक्रमी भागीदारी केली. दुसऱया दिवशीच दोघांनी शतके पूर्ण केली होती. तिसऱया दिवशी ही जोडी फोडण्यात मासाकेझाला यश आले. त्याने ब्रेथवेटला पायचीत करून झिम्बाव्वेला पहिले यश मिळवून दिले. ब्रेथवेटने 312 चेंडूत 18 चौकारांच्या मदतीने 182 धावा जमविल्या. त्याचे द्विशतक हुकले असले तरी चंदरपॉलने आपले द्विशतक पूर्ण केले. 143 षटकाअखेर विंडीजने डाव घोषित केला तेव्हा चंदरपॉल 207 धावांवर नाबाद होता. त्याने 467 चेंडूंच्या दीर्घ खेळीत 16 चौकार व 3 षटकार लगावले. त्याचे हे पहिलेच शतक आहे. या सामन्यात दुसऱया दिवशी पावसाचा थोडावेळ व्यत्ययही आला.
चंदरपॉलचे शतक हे 2013 नंतर ब्रेथवेटशिवाय विंडीजच्या अन्य सलामीवीराने नोंदवलेले पहिलेच शतक आहे. त्यांनी नोंदवलेली त्रिशतकी भागीदारी ही विंडीजतर्फे नोंदवलेली सर्वोच्च सलामी आहे. याआधी गॉर्डन ग्रीनिज व डेस्मंड हेन्स यांनी 1990 मध्ये इंग्लंडविरुद्ध 298 धावांची भागीदारी केली होती. याशिवाय डरेन गंगा व ख्रिस गेल या सलामीवीरांनी झिम्बाब्वेविरुद्ध 2001 मध्ये 214 धावांची भागीदारी याच मैदानावर केली होती.
ही जोडी फुटल्यानंतर काईल मेयर्स (20), रेमन रीफर (2), जर्मेन ब्लॅकवूड (5), रॉस्टन चेस (7), जेसन होल्डर (11) लवकर बाद झाल्यामुळे विंडीजची स्थिती बिनबाद 336 वरून 6 बाद 435 अशी कोलमडली. केवळ 99 धावांत त्यांनी 6 बळी गमविले. ब्रँडन मवुता हा झिम्बाब्वेचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 140 धावांत 5 बळी मिळविले तर एक बळी वेलिंग्टन मासाकेझाने मिळविला.
त्यानंतर दिवसअखेर झिम्बाब्वेने दिवसअखेर 3 बाद 1114 धावा जमविल्या. माकेनी व इनोसंट यांनी सावध फलंदाजी करीत 63 धावांची अर्धशतकी सलामी दिली. माकेनीला 33 धावांवर अल्झारी जोसेफने बाद केले. त्याने 81 चेंडूत 4 चौकार मारले. चामू छिबाबा फार वेळ टिकला नाही. त्याला मोतीने 9 धावांवर बाद केले. यानंतर इनोसंटने आपले अर्धशतक पूर्ण केले. दिवसातील शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर झिम्बाब्वेचा तिसरी गडी एर्विनच्या रूपात बाद झाला. ब्रेथवेटने त्याचा 13 धावांवर त्रिफळा उडविला. तो बाद झाल्यानंतर खेळ थांबवण्यात आला त्यावेळी झिम्बाब्वेने 41.4 षटकांत 3 बाद 114 धावा जमविल्या होत्या. इनोसंट 59 धावांवर खेळत असून त्याने 115 चेंडूत 9 चौकार मारले आहेत.
संक्षिप्त धावफलक ः विंडीज पहिला डाव 143 षटकांत 6 बाद 447 डाव घोषित ब्रेथवेट 182 (312 चेंडूत 18 चौकार), चंदरपॉल नाबाद 207 (467 चेंडूत 16 चौकार, 3 षटकार), मेयर्स 20 (24 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), रीफर 2, ब्लॅकवूड 5, चेस 7, होल्डर 11 (23 चेंडूत 1 षटकार), दा सिल्वा नाबाद 3, अवांतर 10. गोलंदाजी ः ब्रँडन मवुता 5-140, मासाकेझा 1-85.
झिम्बाब्वे ः 41.4 षटकांत 3 बाद 115 ः इनोसंट काइया खेळत आहे 59 (115 चेंडूत 9 चौकार), तनुनुरवा माकोनी 33 (81 चेंडूत 4 चौकार), छिबाबा 9, क्रेग एर्विन 13 (32 चेंडूत 1 चौकार). गोलंदाजी ः जोसेफ 1-25, गुडाकेश मोती 1-25, ब्रेथवेट 1-5.