वृत्तसंस्था/ झ्युरीच
फिफाच्या ताज्या विश्व मानांकन यादीत ब्राझीलने आपले अग्रस्थान कायम राखले आहे. कतारमध्ये नुकत्याच झालेल्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेत अर्जेंटिनाने अजिंक्यपद पटकावताना विद्यमान विजेत्या फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये गेल्या रविवारी पराभव केला होता. अर्जेंटिनाने फिफाची ही विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा आतापर्यंत तीनवेळा जिंकली आहे. त्यांनी 1986 साली पहिल्यांदा विश्व करंडकावर आपले नाव कोरले होते.
चालू वर्षीच्या फेब्रुवारीपासून ब्राझीलने फिफाच्या मानांकन यादीतील आपले अग्रस्थान स्वतःकडे राखताना माजी टॉप सिडेड बेल्जियमला खाली खेचले होते. कतारच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलने तीन सामने जिंकले होते. अर्जेंटिनाने या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले पण हे अजिंक्यपद त्यांना फिफाच्या मानांकनातील अग्रस्थान मिळवण्यासाठी पुरेसे ठरले नाही. फिफाच्या ताज्या मानांकन यादीत ब्राझील पहिल्या, अर्जेंटिना दुसऱया, फ्रान्स तिसऱया, बेल्जियम चौथ्या, इंग्लंड पाचव्या, नेदरलँड्स सहाव्या, क्रोएशिया सातव्या, इटली आठव्या, पोर्तुगाल नवव्या तर स्पेन दहाव्या स्थानावर आहे.