पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दिली कबुली
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी नव्या वर्षानिमित्त देशवासीयांना संबोधित पेले आहे. ब्रिटनच्या अडचणी 2023 मध्येही संपणार नाहीत. उलट 2023 हे आगामी 12 समस्यायुक्त महिन्यांची सुरुवात आहे, असा इशारा त्यांनी जनतेला दिला आहे.
ब्रिटनच्या जनतेच्या कल्याणासाठी मी न थांबता काम करणार आहे, परंतु सर्व समस्या नव्या वर्षात संपतील असा दावा करू शकत नाही. ब्रिटनच्या चांगल्या गोष्टींना जगासमोर आणण्याची संधी हे नवे वर्ष देणार आहे. आमची लोकशाही आणि आमचे स्वातंत्र्य धोक्यात आल्यास आम्ही ते वाचविणार आहोत असे उद्गार सुनक यांनी काढले आहेत.
रशियाला ठरविले जबाबदार
ऋषी सुनक यांनी नववर्षानिमित्तच्या संबोधनात रशियाला लक्ष्य केले आहे. कोरोना महामारीच्या प्रभावातून जग बाहेर पडत असतानाच रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी करत युद्ध सुरू केले. या युद्धाचा पूर्ण जगासह ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवरही प्रतिकूल प्रभाव पडला आहे. युद्धामुळे आलेल्या आर्थिक संकटाला दूर करण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत असल्याचे सुनक यांनी म्हटले आहे.
विरोधकांकडून लक्ष्य
सुनक यांच्या नववर्षानिमित्तच्या संबोधनाचा दाखला देत ब्रिटनमधील विरोधी पक्ष लेबर पार्टीचे नेते सर कीर स्टार्मर यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. ब्रिटनने वाईट काळ अनुभवला आहेत. देशाचे राजकारण बदलण्याची आता वेळ आली असल्याचे म्हणत स्टार्मर यांनी सत्ताबदलाची इच्छा व्यक्त केली आहे.