पुतीन अन् झेलेंस्की दोघांकडून विजयाचा दावा
वृत्तसंस्था / कीव्ह, मॉस्को
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध 11 महिन्यांपासून सुरू आहे. फेब्रुवारी 2022 पासून रशिया सातत्याने क्षेपणास्त्रs डागून युक्रेनला पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहे. नव्या वर्षातही हे युद्ध संपण्याची चिन्हे नाहीत. नव्या वर्षाला सुरुवात होताच रशियाने क्षेपणास्त्रांनी हल्ले करत युक्रेनची राजधानी कीव्हसमवेत अन्य शहरांना लक्ष्य केले आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी दोन्ही देशांच्या नेत्यांनी विजय प्राप्त करण्याची शपथ घेतली आहे.
रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या प्रमुखांनी नववर्षानिमित्तच्या भाषणात विजयासाठी अधिक बळ वापरण्याची शपथ घेतली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्या भाषणात युद्धाचे दुःख अन् जवानांबद्दलची कृतज्ञता दिसून आली. तर रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी देशवासीयांना कर्तव्यांची जाणीव करून दिली आहे. दोन्ही नेत्यांनी या युद्धाला अस्तित्वाची लढाई ठरवत लवकरच याचा शेवट होणार असल्याचे म्हटले आहे.
झेलेंस्की स्वतःच्या 17 मिनिटांच्या व्हिडिओ संदेशात युद्धाची काही सर्वात नाटय़मय क्षण आणि विजयी क्षणांचे स्मरण करताना भावुक झाल्याचे दिसून आले. त्यांनी स्वतःच्या भाषणात देशावरील रशियाच्या हल्ल्यांदरम्यान काळोख अन् थंडीचा सामना करणाऱया देशवासीयांबद्दल गर्व व्यक्त केला. युक्रेनियन या युद्धात विजय मिळेपर्यंत लढत राहतील असे झेलेंस्की यांनी देशवासीयांना संबोधित करतान म्हटले आहे.
विजयाशिवाय पर्याय नाही
पूर्ण देश एक टीमच्या स्वरुपात लढत आहे, याबद्दल मी सर्वांची प्रशंसा करतो. युक्रेनच्या प्रत्येक अजेय क्षेत्राचे आभार मानू इच्छितो, आम्ही विजयासाठी लढत राहणार आहेत. आमच्याकडे आत्मसमर्पण करण्याशिवाय कुठलाच पर्याय नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते, परंतु आमच्याकडे विजयाशिवाय अन्य कुठलाच पर्याय नसल्याचे आम्ही सांगत आहोत असे झेलेंस्की यांनी विधानकेले आहे. या व्हिडिओत झेलेंस्की हे स्वतःचा ट्रेडमार्क खाकी पोशाखात दिसून आले आहेत.
उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न
तर रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी स्वतःच्या देशवासीयांना संबोधित केले आहे. आमचे सैन्य आमची मातृभूमी, सत्य आणि न्यायासाठी लढत आहे. आम्ही हे युद्ध स्वतःच्या कुटुंबांसाठी अन् रशियासाठी जिंकणार आहोत. मागील वर्षी आम्ही अनेक गोष्टी दुरुस्त केल्या आहेत. आम्ही साहस अन् शौर्याला फसवणूक अन्य भ्याडपणाच्या तावडीतून मुक्त केले आहे. आम्ही सर्व मिळून या अडचणी दूर करू आणि आमच्या देशाचा महानपणा कायम राखू असे पुतीन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेवर केले आरोप
पुतीन यांनी स्वतःच्या भाषणात अमेरिकेसह सर्व पाश्चिमात्य देशांवर युद्ध भडकविण्याचा आरोप केला आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियाला हे युद्ध करण्यास भाग पाडले आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य देश आता युक्रेन आणि त्याच्या लोकांना रशियाच्या विरोधात वापरू पाहत आहेत. हा प्रकार आम्ही कधीच खपवून घेणार नसल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.