वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ब्रिटिश कोलंबिया कॉलेज ऑफ मॅनेजमेंटने नवी दिल्लीत आपले पहिले महाविद्यालय स्थापन केले आहे. केंद्र सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार या महाविद्यालयाचे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत, असे संस्थेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. हे महाविद्यालय ग्रेटर नोयडा येथील नॉलेज पार्कमध्ये स्थापन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
ब्रिटिश कोलंबिया कॉलेज ऑफ मॅनेजमेंट भारतातील विविध शिक्षण संस्थांच्या संपर्कात असून भारतात आणखी महाविद्यालये स्थापन करण्याचा विचार करीत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यताप्राप्त कार्यक्रमानुसार अ श्रेणीतील महाविद्यालये स्थापन करण्यात संस्थेला रस आहे.
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार भारतीय शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याचे ध्येय आहे. भारतातील शिक्षण संस्थांनाही विदेशात महाविद्यालये आणि विद्यालये स्थापन करावीत, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विदेशातील सुप्रसिद्ध संस्थांना भारतात शिक्षण संस्था सुरू करण्याची आणि भारतीय विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रवैज्ञानिक तसेच क्यवस्थापकीय आणि वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्याची सोय या शिक्षण धोरणात आहे.
नवी दिल्लीतील महाविद्यालयांमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना कॅनडामध्ये तीन वर्षाचा कार्यपरवाना मिळण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच कॅनडामध्ये कायमस्वरुपी रहिवासी दाखला देण्याचीही सुविधा उपलब्ध आहे.