वाहतूक वळविल्याने प्रवाशांची गैरसोय : व्यावसायिकांना फटका
बेळगाव : पंतप्रधान सोमवारी बेळगावात येणार असून जाहीर सभा आणि रोड शो होणार आहे. त्यामुळे बॅरिकेड्स लावून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शहरांतर्गत बससेवेवर परिणाम होणार आहे. काही गावच्या बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. सार्वजनिक वाहतूक बंद राहणार असल्याने खासगी वाहनांवर ताण येणार आहे. तेदेखील शहराबाहेरच प्रवाशांना सेवा देणार आहेत. एकूणच बसवाहतूक विस्कळीत होणार आहे. दररोज बेळगाव बसस्थानकातून 350 हून अधिक बसेस विविध मार्गांवर धावतात. मात्र, पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे ही सर्व बससेवा विस्कळीत होणार आहे. कोल्हापूर, हुबळी, धारवाड, विजापूर, बिडी, गोकाक, हिडकल, पाच्छापूर, बैलहोंगल आदी बसफेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. त्याबरोबर शहरातील अनगोळ, वडगाव, मजगाव, वंटमुरी, कणबर्गी, रणकुंडये, चंदनहोसूर, सुळेभावी, होनगा, उचगाव, येळ्ळूर, कल्लेहोळ, राकसकोप, मंडोळी, हंदिगनूर आदी बसेसदेखील बंद ठेवल्या जाणार आहेत. ग्रामीण भागातून कामासाठी, दवाखाना आणि व्यवसायासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार आहे. गवळी, भाजीविक्रेते आणि इतर व्यावसायिकांना देखील फटका बसणार आहे. रोड शोसाठी चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली मार्गावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. वाहतूकदेखील इतर मार्गाने वळविली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होणार आहे.