दैनंदिन 10-15 बसेस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न : अधिवेशन काळात मिळणार नाहीत बसेस
बेळगाव : शक्ती योजनेमुळे प्रवाशी संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक सहलींना बस उपलब्ध करून देण्यात परिवहनने असमर्थता दर्शविली होती. या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्याचे अधिकारी आणि परिवहन अधिकाऱ्यांमध्ये समन्वय बैठक झाली. या बैठकीत शैक्षणिक सहलींसाठी दैनंदिन 10 ते 15 बसेस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, अधिवेशन काळात शैक्षणिक सहलींसाठी एकही बस उपलब्ध होणार नाही, अशी माहितीही परिवहनने दिली आहे. शैक्षणिक सहलींसाठी शाळांनी परिवहन बसचाच वापर करावा, असा आदेश शिक्षण खात्याने दिला आहे. मात्र, यंदा जूनपासून शक्ती योजनेला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू आहे. त्यामुळे विविध मार्गांवर प्रवाशांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी बसेसची कमतरता भासू लागली आहे. अशा परिस्थितीत शैक्षणिक सहलींसाठी बसेस उपलब्ध करून देणे परिवहनसाठी डोकेदुखीचे ठरणार आहे. त्यामुळे परिवहनने शैक्षणिक सहलींसाठी बसेस उपलब्ध करून देण्यात असमर्थता दाखविली होती. मात्र, शिक्षण आणि परिवहन खात्याच्या बैठकीत शैक्षणिक सहलींसाठी दैनंदिन 15 बसेस उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यामुळे शैक्षणिक सहलींसाठी यंदा परिवहनच्या बसेस रस्त्यांवर सुसाट धावणार आहेत.
परिवहनसमोर दुहेरी संकट
नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीदरम्यान पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळांना शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जाते. या काळात परिवहनच्या बसेसची मागणी अधिक असते. दरवर्षी सहलींच्या हंगामात दैनंदिन 30 ते 40 बसेस विविध मार्गांवर धावतात. मात्र, यंदा शक्ती योजना व अधिवेशनमुळे अडचणी वाढल्या आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी 100 बसेसची मागणी आहे. त्यामुळे परिवहन बसेसचे नियोजन कसे करणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे शैक्षणिक सहलींना प्रारंभ झाल्याने शाळांकडून बसेसची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे परिवहनसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. परिवहनच्या ताफ्यात 650 हून अधिक बसेस सेवा देत आहेत. त्यात लांब पल्ल्यासाठी धावणाऱ्या बसेसचा समावेश अधिक आहे. शक्ती योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील बससेवा अनियमित झाली असून बससेवेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यातच तोंडावर अधिवेशन आणि शैक्षणिक सहलींच्या हंगामालाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे दैनंदिन बससेवा आणि विशेष बससेवा याबाबत परिवहन कशा पद्धतीने नियोजन करणार, असा प्रश्न पडला आहे. शैक्षणिक सहलींना बस पाठविण्याबाबत अखेर तोडगा निघाला आहे. मागणीनुसार दैनंदिन 10 ते 15 बसेस दिल्या जाणार आहेत. मात्र, याहून अधिक बसेसची मागणी असल्यास शाळा व्यवस्थापनना खासगी वाहनांचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे यंदा शैक्षणिक सहलींच्या नियोजनासाठी बसेसचा घोळ कायम राहण्याची शक्यता आहे.
नियोजन करणे अडचणीचे
शैक्षणिक सहलींसाठी दररोज 10 ते 15 बसेस नियोजनानुसार पाठविल्या जातील. अधिवेशन काळात शैक्षणिक सहलींना बसेस उपलब्ध होणार नाहीत. शक्ती योजनेमुळे प्रवासी संख्या वाढली आहे. त्या तुलनेत बसेस, बसचालक आणि वाहकांची कमतरता असल्यामुळे नियोजन करणे अडचणीचे ठरू लागले आहे.
– के. के. लमाणी-डीटीओ