268 कर्मचाऱ्यांना कॅन्सर : त्वरित रिकामी केला जाणार तळ
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या आण्विक क्षेपणास्त्र तळावर कॅन्सर (कर्करोग) फैलावणारे घटक आढळून आले आहेत. मोंटाना न्यूक्लियर बेसमध्ये मोठ्या संख्येत कर्मचारी कॅन्सरने पीडित असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या वायुदलाने याची पुष्टी केली आहे. क्षेपणास्त्र तळावर कॅन्सर फैलावल्याची तक्रार यापूर्वी करण्यात आली होती. यानंतर आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तळावरून नमुने प्राप्त करण्यात आले, ज्यात कार्सिनोजेन घटक आढळून आला आहे.
आण्विक क्षेपणास्त्र तळावर काम करणारे सुमारे 268 कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबीयांनी मागील काही वर्षांमध्ये कॅन्सर, रक्ताशी निगडित आजार किंवा अन्य गंभीर आजारांनी पीडित असल्याची माहिती दिली आहे. मोंटाना तळावरील 2 क्षेपणास्त्र लाँच सुविधा केंद्रांवरून प्राप्त करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये पीसीबी (कॅन्सर फैलावणारा घटक)ची पातळी इन्व्हॉयरनमेंटल प्रोटेक्शन एजेन्सीकडून जाहीर पातळीपेक्षा अधिक आहे.
अहवाल प्राप्त झाल्यावर अमेरिकेच्या वायुदलाने त्वरित तळ रिकामी करवत तेथे सफाई अन् कॅन्सर फैलावणारे घटक हटविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तळावर काम करणारे कर्मचारी, वायुदलाचे सैनिक आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी उत्तम सुविधा लागू करण्याचे आदेश दिले आहेत. तळावर सर्वाधिक ब्लड कॅन्सरचे रुग्ण आढळून आले आहेत. कॅन्सरने ग्रस्त असलेले बहुतांश लोक हे मिसाइलर आहेत, जे भूमिगत नियंत्रण केंद्रात काम करतात. त्यांच्याकडून क्षेपणास्त्रांवर देखरेख ठेवली जाते आणि गरज भासल्यास साइलो-आधारित आण्विक अस्त्रांच्या क्षेत्रांना लाँच करत असतात.
अध्यक्षांचा आदेशावर होते अंमलबजावणी
यातील 2 मिसाइलरांची नियुक्ती भूमिगत बंकर्समध्ये असते. हे मिसाइलर अध्यक्षांचा आदेश मिळताच मिनटमॅन तीन आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्यासाठी सज्ज असतात. मिनटमॅन 3 चे साइले आणि अन्य भूमिगत नियंत्रण केंद्राला सुमारे 60 वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते.
मूलभूत सुविधांचा अभाव
केंद्रात असलेले बहुतांश इलेक्ट्रॉनिक्स आणि मूलभूत सुविधा कित्येक दशके जुनी आहे. मिसाइलरनी यापूर्वी अनेकदा स्वत:च्या प्रकृतीवर याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याची तक्रार केली होती. तरीही त्यांना खराब व्हेंटिलेटर, पाण्याची खराब गुणवत्ता, विषारी पदार्थांदरम्यान 24-48 तास ऑन ड्युटी राहावे लागत होते. 1960 च्या दशकात मिनटमॅन ऑपरेशन सुरू झाल्यापासून आतापर्यंत अमेरिकेत एकूण सुमारे 21 हजार मिसाइलर राहिले आहेत.
मिनटमॅन 3 क्षेपणास्त्र
मिनटमॅन 3 क्षेपणास्त्र अमेरिकेच्या वायुदलात 50 वर्षांपासून सामील आहे. हे क्षेपणास्त्र पहिल्यांदा 1970 मध्ये तैनात करण्यात आले होते. याचा वेग 24 हजार किलोमीटर प्रतितास इतका आहे. याचा मारक पल्ला 10 हजार किलोमीटर आहे. मिनटमॅनचे पूर्ण नाव एलजीएम-30जी मिनटमॅन-3 आहे. एलजीएमचा अर्थ साइलो लाँच मिसाइल असा होतो. कारण हे भूमिगत साइलोंमध्ये ठेवले जाते. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र जगात कुठलेही स्वत:चे लक्ष्य भेदण्यास सक्षम आहे.