बेळगाव-सांबरा रोडवरील घटना : दोन महिलांसह तिघे जखमी
प्रतिनिधी /बेळगाव
भरधाव कारची बसच्या प्रतीक्षेत असलेल्या दोन महिलांना धडक बसली. त्याआधी रस्त्याशेजारी उभ्या करण्यात आलेल्या दोन दुचाकी व फेरीवाल्यांनाही कारची धडक बसली आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बेळगाव-सांबरा रोडवरील एस. सी. मोटर्सजवळ ही घटना घडली आहे.
या अपघातात दोन महिलांसह तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. स्वीफ्ट कार सांबऱयाहून बेळगावला येत होती. घटनेची माहिती समजताच वाहतूक उत्तर विभाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
माया शिंदोळकर (वय 70, रा. कोनवाळ गल्ली), लक्ष्मीबाई हुंडप (वय 64, रा. ताशिलदार गल्ली) अशी जखमी महिलांची नावे आहेत. फेरीगाडीवरील इस्माईल टीनवाले (वय 52, रा. मारुतीनगर) हे जखमी झाले आहे. या तिघा जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला नव्हता. माया व लक्ष्मीबाई या बसथांब्याजवळ बसच्या प्रतीक्षेत थांबल्या होत्या. दोन दुचाकी व फेरीवाल्यांना ठोकरून स्वीफ्ट कारची या दोन्ही महिलांना धडक बसली. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. कारच्या ठोकरीने हिरो एचडी डिलक्स व हिरो होंडा दुचाकींचेही किरकोळ नुकसान झाल्याचे समजते. केळी व भुईमुगाच्या शेंगा विकणाऱया फेरीवाल्या गाडय़ांनाही कारची धडक बसली असून या अपघातानंतर शेंगा जमिनीवर अस्ताव्यस्त पडल्या होत्या.