जत, वळसंग, प्रतिनिधी
Sangli Accident News : विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील मुचंडी येथे मंगळवारी सायंकाळी सात वाजता एसटी बसला मालवाहतूक ट्रकने पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेत एक जण ठार तर बस मधील 21जण जखमी झाले आहेत.या अपघाता नंतर जखमीना तातडीने जत,विजापूर,मिरज,सांगली तसेच आजूबाजूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यात सात ते आठ प्रवाशी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर गुरुपाद राजेंद्र बिरादार (वय 26, रा. विजयपुर) हा तरुण ग्रामीण रुग्णालयात उपचारा दरम्यान मयत झाला आहे.
अधिक माहिती अशी,सांगोला डेपोची एसटी बस सांगोला -विजापूर अशी आहे. ही बस सांगोला येथून जत येथे सहा वाजता आली.दहा मिनिटे थांबा घेऊन ही बस विजयपुरकडे निघाली.जत तालुक्यातील मुचंडीत थांबा घेऊन पुढे एक कीमी अंतरावर कर्नाटक हद्द लागते.कर्नाटक हद्दीच्या अलीकडे महाराष्ट्र हद्दीतच पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने बसचा पाठीमागील पत्रा उचकटून आतील प्रवाशाना जोरदार दणका बसला. यात अनेक जण गंभीर जखमी झाले.तर काही जणांचे हात पाय निकामी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्याच्या गाड्या व पोलीस अधिकारी,एसटीचे अधिकारी तातडीने जत मधुन घटनास्थळी दाखल झाले. जत येथील रूग्णवाहिका व संख येथील रुग्णवाहिका बोलावून जखमींना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर त्यांना सांगलीला हलविण्यात आले.जत ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची नावे अशी:कोसरदाणू शब्बीर पितले (वय 35), रेखा विष्णू आरले(वय- 35, स्मिता रावसाहेब ठोंबरे, आश्र्विनी रावसाहेब ठोंबरे, गजाबाई सुखदेव गायके (वय- 56), सावित्री राजेंद्र बिरादार (वय- 46), रोहिणी शिवराज मलकापूर (वय-27), गजराबाई सुखदेव वाघमारे(वय- 58), सुंदराबाई वाघमारे (वय-27) (सर्व रा. विजयपुर.सर्वच जखमी प्रवाशांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. आठ ते दहा रूग्ण हे विजापुर येथे हलविण्यात आल्याने त्या जखमींची माहिती व नावे मिळू शकली नाहीत. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.
जत तालुक्यातील मुचंडी येथे कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर दर्याप्पा देवस्थानला जाणाऱ्या रस्त्याच्या फाट्यावर पॅसेंजर उतरत असताना मागून येणारा ट्रक हा उतार व वळण असल्याने भरधाव वेगात एसटीला मागून धडक दिली. त्यात 21 जखमी तर एकाचा उपचारादरम्यान जत सरकारी दवाखाना येथे मृत्यू झाला.गेल्या महिन्यात येथे एका दुकानात ट्रक घुसला होता.