पुणे / वार्ताहर :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहकार परिषदेच्या अनुषंगाने दोन दिवस पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरून त्यांचा कॉन्व्हाय जात असताना निदर्शने करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
राहुल दुर्योधन शिरसाठ, राजू पांडू ठोंबरे (35), स्वप्निल रवींद्र नाईक (27), आशुतोष नितीन जाधवराव (30), अक्षय अनिलकुमार जैन (31), अक्षय प्रकाश माने, योगेश सर्जेराव जाधव यादव (34) या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप अंबादास गायकवाड (37) यांनी आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार भारतीय दंड विधान कलम 143 ,149 ,151 महाराष्ट्र पोलीस कायदा 37 (1) (3), 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहा जुलै रोजी बेकायदेशीररित्या जमाव जमवला. केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा कॉन्व्हाय जात असताना हातात पोस्टर घेऊन या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना आदेश देऊनही ते त्या ठिकाणाहून परतले नाहीत. पुणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक एस कोळीमोन यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.