विद्याधर पिंपळे,कोल्हापूर
कोल्हापूरची बाजारपेठ दिवसेंदिवस विविध वस्तूंने विस्तारत आहे. गेल्या कांही दिवसांपासून बाजारपेठेत ब्रँडेड कंपन्यांच्या नावावर अनेक डुप्लिकेट वस्तूंचा शिरकाव झाला आहे. या वस्तू सर्रासपणे दुकानासह रस्त्यावर विकल्या जात आहेत. या डुप्लिकेट वस्तूंच्या विक्रीमुळे ब्रँडेड कंपन्या, व्यावसायिकांसमोर मोठे आव्हान उभे आहे. कोल्हापुरातील बाजारपेठांत विकल्या जाणाऱ्या ब्रँडेड कंपन्यांपैकी 25 टक्के कंपन्यांच्या वस्तू या पद्धतीने बाजारात विकल्या जात आहेत.
कोल्हापूर ही विविध व्यवसायांची मोठी बाजारपेठ आहे.यामध्ये दैनंदिन कोट्यावधी रूपयांची आर्थिक उलाढाल होत आहे.बाजारपेठेत ब्रँडेड कंपन्यांचे शोरूम्स, डिलर व विक्रेते आहेत. गेल्या कांही दिवसांपासून कोल्हापुरात ब्रँडेड कंपन्यांच्या नावाने अनेक डुप्लिकेट वस्तू विकल्या जात आहेत. याबाबत काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी अशा विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. गोकुळ शिरगांव येथे डुप्लिकेट पत्रे शिट विक्रेत्यावर तर गांधीनगर येथे सॉक्स, टोपी विक्रेत्यावर कारवाई करून,लाखोंचा डुप्लिकेट माल पकडला आहे. ही कारवाई डुप्लिकेटच्या तुलनेत नाममात्र असल्याचे दिसून येत आहे.
गणेश चतुर्थी,दसरा, दिवाळीमध्ये लोकांची मोठी खरेदी होत असते. यामध्ये कपडे, शूज, सौंदर्यं प्रसाधनांची ऑनलाईन व खुल्या बाजारामध्ये खरेदी हेत असते. यामध्ये ब्रँडेड वस्तूंच्या खरेदीकडे अधिक कल असतो.ब्रँडेड वस्तूचा ट्रेडमार्क, लोगो, अक्षर, चित्र, अंक यामध्ये साधर्म्य असलेल्या दर्जाहिन डुप्लिकेट वस्तू बाजारात विकल्या जात आहेत.या डुप्लिकेट वस्तूंवर बारकोड करणारी यंत्रणाही स्थानिक स्तरावर कार्यरत आहे.
कोल्हापुरात झालेल्या कारवाईमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, सॉक्स, एवढेच नव्हे तर बांधकाम क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या नावाचे डुप्लिकेट पत्रे बाजारात विकले जात असल्याचे दिसून आले आहे. विशेषत: महिला डुप्लिकेट वस्तूंना बळी पडत आहेत.साडी, सौंदर्य प्रसाधनांचा यात मोठा समावेश आहे. डुप्लिकेट सौंदर्य प्रसाधनांमुळे अनेकांच्या त्वचेवर परिणाम झाल्याचे सांगण्यात येते.आज सर्वात जास्त डुप्लिकेशन दारू, सिगारेटमध्ये सुरू आहे. काही खाद्यवस्तूही डुप्लिकेट आहेत.अशा डुप्लिकेट खाद्यवस्तूमुळे व्यक्तीच्या शरीरावर परीणाम होण्याचा धोका आहे.
सध्या शेतीची कामे सुरू आहेत.शेतीसाठी लागणाऱ्या खते, बि-बियाणांची मागणी वाढत आहे.गेल्या कांही वर्षापासून खते व बि-बियाणेही डुप्लिकेटमध्ये येऊ लागल्याने,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.एखाद्या नामवंत कंपन्यांचा ट्रेडमार्क, लोगो, चिन्हृ आदीची कॉपी करणे हा कॉपीराईट कायद्यार्तंगत गुन्हा आहे.असे असून देखील ‘हेराफेरी’ करून अशा ब्रॅंडेड कंपन्यांच्या वस्तू विकल्या जात आहेत.
डुप्लिकेट विकल्या जाणाऱ्या वस्तू
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू,कपडे, शूज, बॅगा, सौदर्य प्रसाधने, गॉगल, वाहनांचे स्पेअर पार्ट, रंग, ऑईल, बांधकामातील पत्रे, खाद्यपदार्थ आदी.
कायदा आहे पण कारवाई नाही
डुप्लिकेट वस्तू विक्रीसाठी कायदा आहे.यासाठी मोठ्या कंपन्या कारवाया करत आहेत.या डुप्लिकेट वस्तूंमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.पण तक्रार करण्यास मात्र कोणी पुढे येत नाही.कोल्हापुरात 25 टक्के वस्तू डुप्लिकेट असून, याबाबत तक्रार आल्यास कारवाई करणार आहे.
संजय शेटे,अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज
ग्राहक मंचाकडे तक्रार करा
बाजारात डुप्लिकेट वस्तूंचा सुळसुळाट झाला आहे.यासाठी उत्पादक कंपन्यांनी यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.लोकांनी ब्रॅंडेड कंपन्यांच्या दुकानामध्येच खरेदी करावी.अशी तक्रार आल्यास ग्राहकांनी ग्राहक मंचाकडे तक्रार करावी.
प्रताप बुरांडे, प्रांत संघटनमंत्री, अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र