केंद्र सरकारचे देशवासीयांना आवाहन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रीय पशू कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारी रोजी ‘काउ हग डे’ साजरा करण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. मंडळाच्या आवाहनानुसार काउ हग डेवेळी गायीला आलिंगन देणे अभिपेत आहे. 14 फेब्रुवारी रोजीच जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यात येतो.
भारत सरकारच्या मत्स्य, पशूपालन आणि डेअरी मंत्रालयाच्या निर्देशानुसार पशू कल्याण मंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे. गाय भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पशूधन आणि जैववैविध्याचे गाय प्रतिनिधित्व करते. मानवतेला सर्वकाही प्रदान करणाऱया मातेसमान पोषक भूमिकेमुळे गायीला कामधेनू आणि गोमाता या नावानेही ओळखले जात असल्याचे पशू कल्याण मंडळाने नमूद केले आहे.
पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे वैदिक परंपरा जवळपास विलुप्त होण्याच्या वाटेवर आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आमची भौतिक संस्कृती आणि वारसा विसरला गेला आहे. गायीचे अत्यंत अधिक लाभ पाहता गायीला आलिंगन दिल्यास भावनिक समृद्धी येईल, वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढेल. याचमुळे गोमातेचे महत्त्व विचारात घेत सर्व गायप्रेमी 14 फेब्रुवारी रोजी काउ हग डे देखील साजरा करू शकतात आणि जीवन समृद्ध तसच सकारात्मक ऊर्जेने भरलेले करू शकतात असे पशू कल्याण मंडळाकडून म्हटले गेले आहे.
भारतीय पशू कल्याण मंडळ ही भारत सरकारची घटनात्मक संस्था आहे. पशू क्रूरता निवारण अधिनियम 1960 च्या अंतर्गत याची स्थापना करण्यात आली होती. ही संस्था केंद्र तसेच राज्य सरकारांना पशू कल्याणसंबंधी सल्ला देण्याचे काम करते.