पुणे / प्रतिनिधी :
नवले पुलावरील अपघातांच्या अभ्यासासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दिल्लीतील एक पथक दाखल होणार आहे. हे पथक अपघातांचा शास्त्रीयदृष्टय़ा अभ्यास करणार असून दीर्घ कालावधीसाठी करावयाच्या उपाययोजना सुचवणार आहे. या पथकाचा अहवाल येण्याअगोदर प्राधिकरणाने तातडीच्या काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये खेड शिवापूर येथील टोल नाक्यावर जड वाहनांनाठी चेक पोस्ट उभारले जाणार आहे. तसेच अतिरीक्त स्पिड गन आणि सूचना फलकही लावण्यात येणार आहेत.
नवले पुलावर रविवारी रात्री एका पाठोपाठ तीन अपघात झाले. एका अपघातात कर्नाटकातून तांदूळ घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकने अनेक वाहनांना उडवले. या भीषण अपघातात कोणाचीही जीवीत हानी झाली नाही. मात्र मागील काही दिवस थांबलेले अपघातांचे सत्र पुन्हा सुरू झाले. प्रशासनाने दरी पूल आणि नवले पुलावर अपघात टाळण्यासाठी 22 प्रकारच्या उपाययोजना केल्या होत्या. यामध्ये स्पीड गन, रंम्बलर, पिवळे पट्टे, सूचना फलक लावले गेले होते. या सर्व उपाययोजना करुनही पुन्हा मोठा अपघात घडला. यामुळे यावर ठोस उपायोजना केल्या जाणार आहेत. यासाठी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाची मदत घेण्यात येणार आहे.
अधिक वाचा : मुख्यमंत्री, मंत्री आता लोकायुक्तांच्या कक्षेत
डिझेल वाचवण्यासाठी ट्रक न्यूट्रल
कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रीजदरम्यान आठ किलोमीटरचा उतार आहे. या उतारावर ट्रकसारखे जड वाहन बंद केल्यास तीन लीटर इंधन वाचते. यामुळे ट्रक चालक सर्रास वाहन बंद करुन न्यूट्रल गिअरवर वाहन चालवतात. मात्र महामार्गाच्या आजूबाजूला स्थानिक रहिवाशांसाठी ठिकठिकाणी पंक्चर ठेवले गेले आहेत. येथून अचानक वाहन महार्गावर आल्यास ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून अपघात होतो. वाहन न्युट्रलवर असल्यास त्याचा तातडीने ब्रेक लागत नाही. या अपघातातील ट्रकची प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पाहणी केली असता ट्रकचे ब्रेक व्यवस्थित असल्याचे आढळले. यामुळे ट्रक चालकाने इंधन वाचवण्यासाठी तो न्युट्रलवर चालवला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. ट्रक तपासणीचा अंतिम अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून येणे बाकी आहे.
पाच वर्षांत 23 ठार, 28 जखमी
कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रीजदरम्यान 2018 पासून आजवर 46 मोठे अपघात झाले आहेत. यातील 18 अपघातांमध्ये 23 जणांचा मृत्यू झाला. तर 20 अपघातांमध्ये 28 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. हे अपघात मानवी चुकांमुळे झाले असल्याचे निदर्शणास आले आहे.
अपघातातील मृत आणि गंभीर जखमी
वर्ष मृत जखमी
2018 3 2
2019 2 3
2020 8 13
2021 7 8
एप्रिल 2022 पर्यंत 3 2