सर्वोच्च न्यायालयात पोहोचली स्वयंसेवी संस्था : केंद्रावर केला आरोप
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने (एडीआर) निवडणूक आयुक्त म्हणून अरुण गोयल यांच्या नियुक्तीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गोयल यांची नियुक्ती मनमानी पद्धतीने करण्यात आली असून निवडणूक आयुक्ताच्या संस्थात्मक स्वायत्ततेचे उल्लंघन करण्यात आल्याचा दावा स्वयंसेवी संस्थेने केला आहे.
एडीआरने निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी एक तटस्थ आणि स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने स्वत:च्या लाभासाठी नियोजनबद्ध काळजीपूर्वक तयार करण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत भाग घेतला आहे. 19 नोव्हेंबर 2022 च्या अधिसूचनेद्वारे निवडणू आयुक्ताच्या स्वरुपात अरुण गोयल यांची करण्यात आलेली नियुक्ती मनमानी स्वरुपाची असल्याचा दावा एडीआरने याचिकेत केला आहे.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने 2 मार्च रोजी याच मुद्द्यासंबंधी महत्त्वाचा निर्णय दिला होता. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचे सदस्यत्व असलेल्या समितीच्या शिफारशीवर राष्ट्रपतींनी करावी असे या निर्णयात म्हटले गेले होते.