‘ब्लाइंड’चा फर्स्ट लुक सादर
‘नीरजा’सारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारी बॉलिवूडची फॅशन आयकॉन आणि अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा चर्चेत आहे. सोनम दीर्घकाळानंतर मोठय़ा पडद्यावर ‘ब्लाइंड’ या चित्रपटाद्वारे पुनरागम करत आहे. शोम मखीजा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या क्राइम थ्रिलर चित्रपटाच्या घोषणेनंतर सोनमचे चाहते उत्सुक झाले होते. दिग्दर्शनाने सोशल मीडियावर चित्रपटातील सोनमचा फर्स्ट लुक सादर केला आहे.
कोरियन चित्रपट ‘ब्लाइंड’चा हा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात सोनम कपूर एका पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची कहाणी एका अंध पोलीस अधिकाऱयाच्या अवतीभवती घुटमळणारी आहे. पोलीस अधिकारी एका सीरियल किलरच्या शोधात असल्याचे दाखविण्यात येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सोनम कपूरच्या हातात बंदूक असल्याचे दिसून येत असून अभिनेत्रीचा हा अवतार चाहत्यांना पसंत पडला आहे.
या चित्रपटात सोनम कपूरसोबत पूरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे हे कलाकार दिसून येतील. ‘ब्लाइंड’ याच नावाने 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या कोरियन चित्रपटाचा हा रिमेक आहे. चित्रपटाचे चित्रिकरण ग्लासगो, स्कॉटलंड आणि अन्य ठिकाणी मागील वर्षीच पूर्ण करण्यात आले होते. सोनम कपूर यापूर्वी ‘द जोया फॅक्टर’ या चित्रपटात दिसून आली होती.