24 मारेकऱयांची नावे उघड ः 100 हून अधिक साक्षीदार
चंदिगड / वृत्तसंस्था
सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी मानसा पोलिसांनी शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात एकूण 36 पैकी 24 मारेकऱयांची नावे देण्यात आली आहेत. यात मास्टरमाइंड गँगस्टर लॉरेन्स याच्या नावाचाही समावेश आहे. याशिवाय गोल्डी ब्रार, लिपिन नेहरा, सचिन थापन आणि अनमोल अशी परदेशात बसलेल्या 4 गुंडांची नावे आहेत. आरोपपत्रात 100 हून अधिक साक्षीदारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, मुसेवालासोबत हत्येवेळी उपस्थित असलेले मित्र, पोस्टमार्टम करणारे डॉक्टर, घटनास्थळ परिसरातील हॉटेल कर्मचारी अशा अनेकांचा समावेश आहे. पोलीस लवकरच याप्रकरणी संपूर्ण खुलासा करणार आहेत.
आरोपपत्रात मुसेवालाची रेकी करणाऱया संदीप केकरा याच्या नावाचाही समावेश आहे. याशिवाय नेमबाज प्रियवर्त फौजी, अंकित सेरसा आणि कशिश उर्फ कुलदीप यांचीही नावे आहेत. अमृतसरमधील चकमकीत मारले गेलेले शूटर मनप्रीत मन्नू आणि जगरूप रुपा यांचीही नावे आहेत. याशिवाय त्यांना मदत करणाऱया मनप्रीत भाऊ, मनप्रीत मन्ना, सराज मिंटू, मनमोहन मोहना, सचिन भिवानी आदी साथीदारांचा समावेशही करण्यात आला आहे.