दांपत्या विरुध्द एफआयआर दाखल, पोलीस तपास सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, दर महा चांगला परतावा मिळेल, असे सांगत एका दाम्पत्याने गुंतवणूकदारांना सुमारे दीड कोटी रुपयांना ठकविल्याची घटना घडली आहे. ही घटना उशिरा उघडकीस आली असून येथील सीईएन पोलीस स्थानकात एफआयआरही दाखल झाला आहे.
मूळचे नागोर्डा (ता. खानापूर) येथील व सध्या भाग्यनगर येथे राहणारे वसंत कृष्णाजी महाजन, त्याची पत्नी रक्षिता महाजन या दोघा जणांवर भा.दं.वि. 406, 420 व द बॅनिंग ऑफ इन रेग्युलेटेड डिपॉजिट स्कीम्स 2019 अन्वये येथील सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे.
शाहूनगर येथील दुर्गा कलहाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाम्पत्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून सीईएन विभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत. केवळ दुर्गा यांचेच नव्हे तर या दाम्पत्याने अनेकांकडून शेअर मार्केटच्या नावे आपल्या कंपनीत मोठी रक्कम भरून घेऊन परतावा तर नाहीच मूळ मुद्दलही दिली नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे.
अंजना कंबळी, राजाराम माने, चैत्रा सुरेश जंजी, माणिक्य शहा पाटील, बाहुबली चंद्रकांत पाटील, हेमंत मुतगेकर, संजीव मुंडोळी, चेतन पुंडी आदींनी व्ही. आर. एन्टरप्रायझेस, व्ही. आर. ट्रेडींग्समध्ये गुंतवणूक केली असून या गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
21 जानेवारी 2023 रोजी यासंबंधी एफआयआर दाखल झाला आहे. तेव्हापासूनच सीईएन विभागाचे अधिकारी तपास करीत आहेत. बँकेत काम करताना दुर्गा यांची वसंत महाजन यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी शेअर मार्केटिंगमध्ये अडीच लाख रुपये गुंतवणूक केल्यास दरमहा 4 टक्के नफा देण्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीचे दोन ते तीन महिने नफा देण्यात आला व नंतर नफा तर नाहीच गुंतवणूक केलेली रकमही परत करण्यात आली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.