शहर म. ए. समितीकडे एकूण 10 अर्ज दाखल
प्रतिनिधी / बेळगाव
विधानसभा निवडणुकीसाठी शहर म. ए. समितीतर्फे इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी दक्षिण मतदारसंघासाठी 8 जणांनी तर उत्तर मतदारसंघासाठी 2 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
शहर म. ए. समितीचे कार्यालय रंगुबाई पॅलेस येथे या सर्वांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये वल्लभ गुणाजी, रतन मासेकर, शुभम शेळके, आप्पासाहेब गुरव, रमाकांत कोंडुसकर, रवि साळुंखे, माजी आमदार मनोहर किणेकर, मदन बामणे यांनी दक्षिण मतदारसंघासाठी अर्ज दाखल केले तर उत्तर मतदारसंघासाठी ऍड. अमर येळ्ळूरकर व नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. शहर म. ए. समितीकडे एकूण 10 अर्ज दाखल झाले आहेत.
म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज घेण्यासाठी शिवराज पाटील, अंकुश केसरकर आणि श्रीधर खन्नुकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडे हे अर्ज दाखल झाले आहेत. दक्षिण मतदारसंघासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केल्यामुळे यावेळी समितीचे वर्चस्व निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल होत असल्यामुळे रंगुबाई पॅलेस परिसरात मोठी गर्दी झाली होती. आता अर्ज स्वीकारल्यानंतर एका उमेदवाराची निवड केली जाणार आहे.