कॉनवेचे अर्धशतक, सीएसकेचा भेदक मारा, मोईन अलीचे 3 बळी
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
देव्हॉन कॉनवेचे शानदार अर्धशतक आणि गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीमुळे चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएलमधील साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 91 धावांनी धुव्वा उडविला. चेन्नईचा हा चौथा विजय असून त्यांनी आठव्या स्थानावर झेप घेतली आहे.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर चेन्नई सुपरकिंग्सने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 208 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर मोईन अली, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, ड्वेन ब्रेव्हो यांच्या भेदक माऱयापुढे दिल्ली कॅपिटल्सचा डाव 17.4 षटकांतच 117 धावांत आटोपला. दिल्लीच्या केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. दुसऱया षटकांपासून त्यांच्या डावाला गळती सुरू झाल्यानंतर ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले. वॉर्नरने 19, मार्शने 25, कर्णधार रिषभ पंतने 21, शार्दुल ठाकुरने 24 धावा केल्या. अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी धावा करता आल्या नाहीत आणि 18 व्या षटकात त्यांचा डाव संपुष्टात आला. मोईनने 3, चौधरी, सिमरजीत, ब्रेव्हो यांनी प्रत्येकी 2, तीक्षणाने 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, कॉनवेने 49 चेंडूत 87 फटकावताना 7 चौकार, 5 षटकार मारले. त्याने ऋतुराज गायकवाडसमवेत सलामीला 110 धावांची भागीदारी करीत मोठय़ा धावसंख्येची पायाभरणी केली. गायकवाडने 33 चेंडूत 41 धावांचे योगदान दिले. कॉनवेने नंतर दुसऱया गडय़ासाठी शिवम दुबेच्या साथीने 59 धावांची भर घातली. दुबेने 19 चेंडूत 32 धावा काढल्या. अखेरच्या टप्प्यात कर्णधार धोनीने फटकेबाजी करीत 8 चेंडूत एक चौकार, 2 षटकार मारत नाबाद 21 धावा काढल्याने चेन्नईला दोनशेचा टप्पा पार करता आला.
कॉनवे हा चेन्नई संघातील महत्त्वाचा घटक बनला असून डय़ू प्लेसिसची जागा त्याने चांगल्या प्रकारे भरून काढल्याचे दिसून येत आहे. तो स्पिनर्सना चांगल्या प्रकारे खेळत असल्याने आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन करीत आहे. चेन्नईच्या प्लेऑफ गाठण्याच्या अंधूक असल्या तरी कॉनवेने या संघातील आपली जागा पक्की केली असून पुढील किमान तीन वर्षे तरी तो या संघात राहण्याची अपेक्षा आहे.
गायकवाडसमवेत त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्ला करीत त्यांचे खच्चीकरण कसे करावे, याचा वस्तुपाठच त्याने या खेळीत दाखवला. त्याने आपल्या खेळीत लॅपस्कूप, स्विचहिट, रिव्हर्स फ्लिक असे कोणतेही फटके मारले नाहीत. त्याने व्हीमध्ये कॉपीबुक फटके मारतच आपली खेळी सजवली. स्पिनर्सविरुद्ध त्याने पदलालित्याचा उत्तम उपयोग केला. दिल्लीच्या कुलदीप यादवला या डावात लय सापडली नाही. त्याने 3 षटकांत 43 धावा दिल्या. कॉनवेने या मोसमातील तिसरे अर्धशतक केवळ 27 चेंडूत पूर्ण केले. प्रारंभापासूनच आक्रमक खेळ केल्याने चेन्नईचे शतक 10 षटकात फलकावर लागले.
दिल्लीच्या ऍन्रिच नॉर्त्जेने 3 बळी मिळविले असले तरी 4 षटकात त्याने 42 धावा दिल्या. शार्दुल ठाकुरला एकही बळी मिळाला नाही, पण त्याने 3 षटकात 38 धावा दिल्या. केवळ खलील अहमदने अचूक मारा करीत दोन बळी मिळविताना 4 षटकात 28 धावा दिल्या.
संक्षिप्त धावफलक ः चेन्नई सुपरकिंग्स 20 षटकांत 6 बाद 208 ः गायकवाड 41 (33 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), कॉनवे 87 (49 चेंडूत 7 चौकार, 5 षटकार), शिवम दुबे 32 (19 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), रायुडू 5, धोनी नाबाद 21 (8 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), ब्रेव्हो नाबाद 1, अवांतर 12. गोलंदाजी ः नॉर्त्जे 3-42, खलील अहमद 2-28, मिशेल मार्श 1-34.
दिल्ली कॅपिटल्स 17.4 षटकांत सर्व बाद 117 ः वॉर्नर 19 (12 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), मार्श 25 (20 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), पंत 21 (11 चेंडूत 4 चौकार), शार्दुल ठाकुर 24 (19 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार). गोलंदाजी ः मोईन अली 3-13, चौधरी 2-22, सिमरजीत सिंग 2-27, ब्रेव्हो 2-24, तीक्षणा 1-29.