प्रतिनिधी /म्हापसा
कोल्हापूरमधून कोंबडय़ा विक्रीसाठी घेऊन आलेल्या बोलेरो जीपला सांगोल्डा येथे अटकाव करणे व नंतर ती पळवून नेल्याप्रकरणी साळगाव पोलिसांनी एका अल्पवयीनासह तिघां चोरटय़ांना अटक केली आहे.
परशुराम (पुष्पा) बसुराज कांबळे (22) रा. मोलेभाट साळगाव, अजय आनंद देऊसकर (22) रा. साळगाव, अशी त्यांची नावे आहेत. 17 वर्षीय अल्पवयीनाची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. हा प्रकार रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास चोगम रस्ता सांगोल्डा येथे घडला.
शिवराज पाटील (गडहिंग्लज-कोल्हापूर) हे के.ए.22 सी-9320 क्रमांकाची कोंबडीवाहक बोलेरो जीप घेऊन साळगावकडे चालले होते. त्यांच्यासोबत वाहक होता. सांगोल्डा येथे जीप पोहोचताच संशयितांनी जी.ए.-03-क्यू-6734 क्रमांकाची ऍक्टिव्हा स्कूटर रस्त्यात आडवी घालून जीप अडविली व फिर्यादी व त्याच्या सहकाऱयाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच जीपची चावी हिसकावून घेत जीप घेऊन तिघेही पसार झाले. सदर जीपमध्ये 590 कोंबडय़ा व 5 हजार रुपये रोकड मिळून 3 लाखांचा मुद्देमाल होता. फिर्यादीने साळगाव पोलीस स्थानकात घटनेची माहिती दिली. घटनेवेळी संशयितांपैकी एकाने आपले नाव पुष्पा म्हणून सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करीत संशयित परशुराम कांबळे यास पकडून ताब्यात घेतले व अटक केली. संशयिताने आपल्या साथीदारांची नावे उघड करताच पोलिसांनी त्यांना पकडून अटक केली व चोरलेली जीप, कोंबडय़ा, रोख रक्कम आणि संशयितांची दुचाकी जप्त केली.
पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना, उपअधीक्षक विश्वेश कर्पे, निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतिकेश खेडेकर, नवनीत गोलतेकर, कॉन्स्टेबल विजय पाळणी, विशांत मयेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.