प्रतिनिधी /मडगाव
सांगेत ‘आयआयटी’ला (भारतीय तंत्रज्ञान संस्था) विरोध झाल्याने आयआयटी सारखा महत्वाचा शैक्षणिक प्रकल्प कुठे होणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. काल सोमवारी या संदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आयआयटी दक्षिण गोव्यातच होणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, हा महत्वाकांक्षी प्रकल्प दक्षिण गोव्यात नेमका कुठे होईल यावर भाष्य केले नाही.
आयआयटीला या पूर्वी काणकोण व नंतर सांगेत विरोध झाला. त्यात सांगेत आयआयटीसाठी जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, ही जागा अपुरी पडू लागल्याने, त्या जागेत आयआयटी प्रकल्प होणार नसल्याचे केंद्रातून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आयआयटी नेमकी कुठे होईल असा सवाल उपस्थित झाला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आयआयटी दक्षिण गोव्यातच होईल हे स्पष्ट केले.
आयआयटी सांगेत ?
सांगेचे आमदार तथा समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी आयआयटी सांगेतच होईल असे विधान हल्लीच केले होते. काल पुन्हा सुभाष फळदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता आयआयटी सांगेतच होईल व आपण त्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आयआयटी सांगेतच होईल असे आपण म्हणणार नाही. पण, आयआयटी नक्कीच होईल असे म्हटले.
मुख्यमंत्री प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आयआयटी साठी सद्या जागा शोधली जात असून ही जागा उपलब्ध झाल्यावर ती ताब्यात घेतली जाईल व संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्यावर भाष्य केले जाईल.