तीन दिवस भरगच्च कार्यक्रम, राहूल देशपांडे यांचे गायन चिखलकाल्याचे पारंपरिक खेळ
प्रतिनिधी / पणजी
पर्यटन खात्यातर्फे यंदा प्रथमच भव्य स्वरूपात 28 ते 30 जून या कालावधीत तीन दिवस माशेल येथे ‘चिखलकाला’ आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवास प्रोत्साहन देणे आणि पर्यटन वाढवणे हा त्या मागील प्रमुख उद्देश असून या निमित्ताने 28 जून रोजी रात्री 8 वाजता राहूल देशपांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम माशेलच्या देवकीकृष्ण मंदिरात होणार आहे. या उत्सवात प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.
हा उत्सव राज्यस्तरावर आखण्यात आला असून त्यास जास्तीत जास्त लोकांनी यावे, पर्यटकांनी भेट देऊन तो पहावा व त्यात सहभागी व्हावे ही पर्यटन खात्याची अपेक्षा आहे. चिखल पुल्स, भक्तीपर सोहळा, गोमंतकीय सांस्कृतिक कार्यक्रम, शाकाहारी खाद्यपदार्थ, फुड स्टॉल्स, चिखलकाल्याचे पारंपरिक खेळ यांचा समावेश आहे. माशेलचा चिखलकाला गोव्यात प्रसिद्ध आहे. त्यास आता पर्यटन खात्याने मोठे स्वरूप दिले असून कार्निव्हल, शिमगोत्सवाप्रमाणे चिखलकालाही पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
माशेलचा चिखलकाला हा पारंपरिक उत्सव आहे. तो अधिक प्रसिद्ध करण्यासाठी पर्यटन खात्याने पावले उचलली असून अशा प्रकारे गावा-गावातील उत्सवांना मोठी ठळक प्रसिद्धी देऊन पर्यटकांची पावले तिकडे वळवून त्यांना नवीन काहीतरी देण्याचे पर्यटन खात्याचे प्रयोजन आहे.