सेसाच्या कामगारांवर टांगती तलवार आमदार, नगरपालिका व कामगारांची संयुक्त बैठक स्थानिक कामगारांना डावलल्यास रस्त्यावर उतरू
डिचोली / प्रतिनिधी
डिचोलीतील सेसा खाण कार्यरत असलेले खाण लीज वेदांत कंपनीने घेतल्यानंतर याच कामगारांना कामावर ठेवण्यासाठी वेदांत कंपनीने कामगारांसमोर ठेवलेल्या दहापैकी दोन अटी कामगारांनी मान्य न केल्याने मुदत संपताच कंपनीने या कामगारांचे अंतिम सेटलमेंट केले आहे. या प्रकारामुळे कामगारांमध्ये खळबळ माजली असून त्यांना धक्काच बसला आहे. हवालदिल झालेल्या कामगारांनी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, नगराध्यक्ष कुंदन फळारी व इतर नगरसेवकांबरोबर संयुक्त बैठक घेतली. कामगारांच्या विषयावर आपण संवेदनशील व गंभीर असून प्रसंगी सरकारविरोधातही जाण्यास आपण तयार आहे, अशी स्पष्ट ग्वाही यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी यावेळी कामगारांना दिली.
वेदांत कंपनीने डिचोली खाण ब्लॉकचे लीज घेतल्यानंतर कंपनी व खाण प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. या खाणीवर कामावर असलेल्या कामगारांच्या समोर कंपनीने दहा अटी ठेवल्या होत्या व 23 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यातील दोन अटी कामगारांना मान्य नसल्याने 205 कामगारांनी कंपनीला आपली सहमती कळवली नाही. त्यामुळे कंपनीने 23 रोजीच संध्या. 5.30 वा. सहमती न दिलेल्या कामगारांच्या खात्यांवर अंतिम सेटलमेंटचे पैसे जमा केले.
त्यामुळे या कामगारांमध्ये एखच खळबळ उडाली. धेंपो कंपनी ज्यावेळी या खाणीवर कार्यरत होती, त्यावेळेपासून हे कामगार या कंपनीत कामाला आहेत. त्यानंतर सेसा कंपनीने ही खाण घेतली. सेसाने याच कामगारांना कायम ठेवत काम केले होते. त्यानंतर खाणी बंद पडून या कामगारांचे काय हाल झाले ते सर्वश्रुत आहे. पण आज या कामगारांना वेदांत कंपनीने थेट घरचा रस्ता दाखविला आहे. हा कामगारांवर अन्याय आहे, असे कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर यांनी म्हटले.
आपण कामगारांबरोबरच, सरकारच्याही विरोधात जाण्यास तयार – आमदार
आपण एक आमदार आहे. मुख्यमंत्री नाही. त्यामुळे खाण कामगारांच्या विषयी आपण आजपर्यंत कामगारांसमवेतच राहिलो आहे. वेदांत कंपनीला केवळ या खाणीचे लीज मिळाले आहे. यापुढे त्यांना अनेक परवान्यासाठी स्थानिक नगरपालिकेच्या ना हरकत दाखल्यांची गरज लागणारच आहे. आपण सदैव कामगारांबरोबरच असून आपल्याला कंपनीचे काहीच देणेघेणे नाही. प्रसंगी आपण या कामगारांसाठी सरकारच्या विरोधातही जाण्यास तयार आहे. लवकरच या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेप यांच्यासह बैठक घेऊन तोडगा काढू, असे आश्वासन आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी यावेळी दिले.
कामगारांवरील अन्यायामुळे कायदा सुव्यवस्थाही बिघडू शकते
सेसा नंतर आता वेदांत कंपनीने या कामगारांवर अन्याय करण्याचे सत्र आरंभले आहे. या कामगारांना थेट सेटलमेंट देऊन कंपनी घरी पाठवू शकत नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाणी सुरू करताना लीज कोणत्याही कंपनीने घेतले तरीही स्थानिक व विद्यमान कामगरांनाच प्रथम प्राधान्य देण्यासाठी कंपनीला भाग पाडणार, अशी ग्वाही दिली होती. परंतु आज वेदांत कंपनीने लीज हातात आल्या आल्याच कामगारांना घरी पाठविण्याचे तयारी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेत विरले आहे. या कामगारांवर घरी बसण्याची पाळी आल्यास सर्व कामगारांची कुटुंबे रस्त्यावर उतरणार व कायदा सुव्यवस्थाही बिघडू शकते. आणि तसे झाल्यास त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असणार, असे कामगारांचे कायदा सल्लागार अॅड. अजय प्रभूगावकर यांनी सांगितले.
स्थानिक कामगारांना डावलल्यास रस्त्यावर उतरू – जि.पं. सदस्य
डिचोली तालुक्मयातील स्थानिक भुमीपूत्रांच्या जमीन, बागायती नष्ट करून खाणवाल्यांनी आपले बस्तान बसविले होते. त्याच मोबदल्यात त्यांना या स्थानिक लोकांना कामावर घेतले होते. परंतु आज जर वेदांत कंपनी या खाण कामगारांनाच डावलत असल्यास त्याचा उद्रेक होणार व सर्व गावे रस्त्यावर उतरणार. त्यावेळी मये व डिचोलीच्या आमदारांनी या कामगारांच्या बाजूने ठामपणे रहावे, असे जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर यांनी म्हटले.
या बैठकीस आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांच्यासह नगराध्यक्ष कुंदन फळारी, उपनगराध्यक्षा सुखदा तेली, नगरसेवक निलेश टोपले, सतीश गावकर, दिपा पळ, गुंजन कोरगावकर, रियाझ बेग, कायदा सल्लागार अॅड. अजय प्रभुगावकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर व इतर सदस्य, तसेच सर्व कामगार उपस्थित होते.