चिल्ड्रन्स कोर्टाचा निवाडा सर्वोच्च न्यायालयात कायम
मडगाव : मडगावच्या 11 वर्षाच्या एका विशेष मुलाच्या 20 लाखांच्या खंडणीसाठी केलेल्या अपहरणप्रकरणी पणजीच्या चिल्ड्रन कोर्टने मडगाव परिसरातील दोन वाहन चालकांना दिलेली जन्मठेपेची दिल्लीतील सर्वोच न्यायालयाने शिक्षा कायम केली आहे. मडगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि सध्या मडगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी थरारक पाठलाग करुन आणि गोळीबार करुन आरोपीना जेरबंद केले होते. 20 लाखांच्या खंडणीसाठीची ही घटना सप्टेंबर 2011 मध्ये घडली होती. सदर विशेष मुलगा फातोर्डा येथील एका विद्यालयात जात होता आणि त्याला ने- आण करण्यासाठी पालकाने एक चालक ठेवण्यात आला होता.
त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर या विशेष मुलाला कारमध्ये ठेऊन हा चालक जवळच असलेल्या एका दुकानात गेल्याचे पाहून या प्रकरणातील आरोपी रुपेश उर्फ उदय फाळकर (32) व दवर्ली येथील व्हिक्टर फर्नाडिस (33)s यांनी या विशेष मुलाचे अपहरण केले आणि दुसऱया एका कारमध्ये नेऊन त्या मुलाला फोंडय़ाच्या दिशेने घेऊन गेले. काही अंतर गेल्यानंतर आरोपीनी या विशेष मुलाच्या पालकाच्या घरात लँण्डलाईनवर फोन केला आणि 20 लाख रुपये घेऊन फोडा येथे येण्याची सुचना केली. विशेष मुलावरील मायेमुळे पालकांनी मडगावच्या एका बँकेतून 20 लाख रुपये काढले. एव्हाना ही घटना मडगाव पोलिसांच्या कानी गेली होती. पोलीस निरीक्षक संतोष देसाई हे त्यावेळी मडगावचे पोलीस निरीक्षक होते. त्यांनी एका खबऱयाला चालक म्हणून फोंडा येथे कार चालक म्हणून पाठवले. त्याच्याबरोबर 20 लाखांची रक्कमही देण्यात आली होती.
फोंडा येथे गेल्यानंतर आरोपींनी या कार चालकाला दोनदा अमूक जागेवर या अशी सुचना केली होती आणि शेवटी कुर्टीजवळ आमीगो जंक्शनजवळ चालत येण्याची सुचना केली. 20 लाखांची खंडणीची रक्कम घेऊन चालक चालत चालत सांगितलेल्या कारजवळ आला तेव्हा आरोपीनी आपल्या तोंडावर बुरखा घातला होता खंडणीची रक्कम घेऊन आलेल्या कार चालकाने आरोपी बसलेल्या कारमध्ये विशेष मुलाला पाहिले आणि त्याची खबर त्याने मडगाव पोलिसांना दिली होती. दुसऱया बाजुने मडगाव पोलिसांनी एकूण तीन पथके तयार केली होती. पुढे असलेल्या पथकाचे नेतृत्व संतोष देसाई करीत होते. आरोपींची कार खंडणीची रक्कम घेऊन खांडेपारच्या दिशेने जाऊ लागली तेव्हा पोलिसांनी आरोपीच्या वाहनाला थांबण्याचा इशारा केला होता आणि आरोपी आपले वाहन थांबवत नसल्याचे पाहून थरारक पाठलाग करीत पोलिसांनी पुढे जात असलेल्या कारवर सावधगिरी बाळगून गोळीबार केला होता. पुढे जात असलेल्या कारवर आठ फैरी झाडण्यात आल्या होत्या आणि शेवटी पोलिसांनी आरोपींची कार अडविण्यात यश मिळवले आणि खांडेपारजवळ या दोन्ही आरोपींच्या मुसक्या बांधून त्यांना अटक केली आणि विशेष मुलाची सुटका केली होती.
चिल्ड्रन्स कोर्टाचा निवाडा सुप्रिम कोर्टात कायम
पणजीच्या चिल्ड्रन्स कोर्टच्या तत्कालीन न्यायाधीश वंदना तेंडुलकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला तेव्हा साक्ष व भक्कम पुरावे यावर आधारुन या न्यायालयाने मोतीडोंगर -मडगाव येथील आरोपी रुपेश उर्फ उदय फाळकर (32) व दवर्ली येथील व्हिक्टर फर्नाडिस (33) यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरुद्ध या दोन्ही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपिठात आव्हान दिले तेव्हा या खंडपिठानेही या दोन्ही आरोपींचे आव्हान अर्ज फेटाळून लावले होते. त्यानंतर या आरोपीना उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हात दिले होते. सर्वोच्च न्यायालयानेही या दोन्ही आरोपींचे अर्ज हल्लींच फेटाळून लावले आणि पणजीच्या चिल्ड्रन्स कोर्टच्या तत्कालीन न्यायाधीश वंदना तेंडुलकर यांनी दिलेला आदेश कायम केला.