गोवा फॉरवर्ड पक्षाकडून मुख्य सचिवांना पत्र
मडगाव : गोव्यातील शाळांना माध्यान्ह आहार पुरवठा करणाऱया स्वयंसाहाय्य गटांना प्रलंबित देय रक्कम देण्यास सरकारकडून विलंब होत असल्याबद्दल गोवा फॉरवर्डचे आयोजन सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. माध्यान्ह आहार योजनेंतर्गत गरीब शालेय विद्यार्थ्यांना पुरविले जाणारे अन्न राज्यभरातील अनेक स्वयंसाहाय्य गटांद्वारे पुरवले जाते. हे स्वयंसाहाय्य गट म्हणजे ना नफा तत्त्वावर काम करणाऱया संस्था आहेत ज्या त्यांच्या सदस्यांना उपजीविकेचे साधन प्रदान करतात. एकीकडे अन्न तयार करण्यासाठी लागणारे आवश्यक घटक आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती तसेच प्रवासावर होणाऱया खर्चामुळे त्यांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होत आहे. त्यांचे काम चालू ठेवण्यासाठी सरकारने त्यांना जी रक्कम द्यायची आहे ती वेळेवर देणे महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने, आम्हाला यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असे कामत यांनी त्यात म्हटले आहे. यंदा जानेवारीत झालेल्या विधानसभा अधिवेशनाच्या दरम्यान गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी विविध स्वयंसाहाय्य गटांना शिक्षण खात्याकडून यायच्या असलेल्या रकमेसंदर्भात तपशील मागितला होता. एकूण रक्कम 3 कोटी 75 लाख 36 हजार 441 रुपये आहे. ही परिस्थिती स्वीकारार्ह नाही. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या वतीने आम्ही विनंती करतो की, अधिक विलंब न लावता प्राधान्याने देयके जारी करण्यासाठी संबंधित विभागाला योग्य निर्देश द्यावेत, असे कामत यांनी या पत्रात नमूद केले आहे.