वार्ताहर /लाटंबार्से
सावरधाट धनगरवाडा लाटंबार्से येथे दोन महिन्यापूर्वी बाबलो शिंगाडी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते व आता दि. 20 मे रोजी त्यांची पत्नी संगीता शिंगाडी यांचेही आमठाणे धरणात बकऱ्यांना पाणी पाजण्यसाठी गेल्या असता मगरीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. एकापाठोपाठ दोन महिन्याच्या आत आईवडिलांचे छत्र हरपल्याने त्यांची तिन्ही मुले पोरकी झाली. उमेश शिंगाडी (25), कविता शिंगाडी (20) व भगवान शिंगाडी (14) ही त्यांची मुले असून त्यातील दोन मुले सरकारी नोकरीच्या आशेत आहेत. सदर घटनेची दखल घेऊन गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळ डिचोली तालुका समितीने शिंगाडी कुटुंबियांच्या मुलांना तात्काळ आर्थिक मदतीचा धनादेश दिला व इतर समाजसेवी संस्थाना सदर कुटुंबाला मदतीचा हात द्यावा व आर्थिक सहाय्य पुरवावे, असे आवाहन केले आहे. आतापर्यंत एकही सरकारी अधिकारी विचार पुस करण्यासाठी शिंगाडी यांच्या घरी आला नाही, आम्ही धनगर समाज समिती गोवा सरकार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, वनमंत्री विश्वजित राणे यांना विनंती करतो की आईवडिलविना पोरक्या झालेल्या सदर शिंगाडी कुटुंबाच्या मुलांना मदत करावी व एक तरी सरकारी नोकरी मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे.