विकास कामे जनतेपर्यंतं पोहोचवा : मुख्यमंत्र्यांचे आवाहन
सांखळी : भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात पक्ष विस्तारित करण्यासाठी विविध उपक्रम राबवत असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता गोव्यातही भाजपने ‘टिफिन पे चर्चा’ विषयावर खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचा पहिला कार्यक्रम सांखळी मतदारसंघात वेळगे येथील सातेरी मंदिर सभागृहात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी विविध विषयांवर मुख्यमंत्री सावंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून कानमंत्र दिला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजप कार्यकर्त्यांनी टिफिन आणले होते. यावेळी मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, सरपंच सामंता कामत, उपसरपंच लवू आमडकर, ज्येष्ठ कार्यकर्ते शंबा गावकर, पंच स्वेता गावकर, सर्वेश घाडी, सर्वेश मुळगावकर, महिला मोर्चा प्रतिनिधी उन्नती सहस्त्रबुद्धे, या स्थानिक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच सांखळी नगराध्यक्ष रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, कुडणे सरपंच राजन फाळकर, न्हावेली सरपंच कालिदास गावस, आमोणा सरपंच कृष्णा गावस, हरवळे उपसरपंच ममता दिवकर, संतोष नाईक, गुऊप्रसाद नाईक, चंद्रकांत घाडी, प्रदीप गावडे, दायानंद बोर्येकर, अंकुश मळीक, संतोष मळीक, सागर फडते, सुभाष मळीक, अंजली हळर्णकर, साहिमा गावडे, अनिल कुंडईकर, विभा गावस इत्यादी अनेक भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांनी थेट आपल्याशी चर्चा करावी : मुख्यमंत्री
मतदारसंघात भाजपचे सर्व कार्यकर्ते निवडणुकीत वेळी मन लावून काम करतात. विकासात आम्ही कुठेही मागे राहिलो नाही तरीही निवडणूक काळात नागरिकांचे पक्षा कडे दुर्लक्ष का होते, आम्हाला मते का मिळाली नाही याचे मंथन होणे आवश्यक आहे. तसेच कार्यकर्त्यांनी आपले एखादे काम रखडल्यास पक्षाबाबत अपप्रचार करू नये. त्यामुळे पक्षाचे नुकसान होते. भारतीय जनता पक्ष हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार पक्ष असून पक्ष विस्तारासाठी सगळ्यांनी संघटित कार्य करायचे आहे. मतदारसंघातील शेवटच्या नागरिकांपर्यंत आम्हाला पोचायला हवे, त्याचा सर्वांगीण विकास साधायला हवा. यासाठीच मतदारसंघात ‘टिफिन पे चर्चा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून प्रत्येक तीन महिन्यांत गावात गावात मार्गदर्शन, चर्चासत्र कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. अशाने विचारांची देवाणघेवाण कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. सांखळी मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांनी कार्यक्रम विषयावर सविस्तर माहिती दिली. सरपंच सामंता कामत यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. वेळगे गावात मुख्यमंत्री सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कामांची उपस्थिताना माहिती दिली.
विविध खाद्यपदार्थांचा टिफिनमध्ये समावेश
या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सहीत बहुतेक कार्यकर्त्यांनी टिफिन आणला होता. त्यात खाद्य पदार्थ होता. पाळी, वेळगे, सुर्ला, कुडणे, न्हावेली, आमोणा, हरवळे आणि सांखळी परिसरातील प्रमुख कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वानी आपआपला टिफिन एकमेकांना वाटला. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी बनवलेले पदार्थ खाण्याचा योगही आला. तसेच यापुढे ही या कार्यक्रमात कार्यकर्ते स्वत:हून टिफिन घेऊन येणे, असे मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.