प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव येथील चित्पावन ब्राह्मण संघ, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ आणि कऱहाडे ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रामनाथ मंगल कार्यालय, भाग्यनगर येथे मंगळवार दि. 11 रोजी कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर वरील सर्व संघांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष उपस्थित होते.
समृद्धी आगाशे हिच्या गणेश वंदनानंतर ब्राह्मण संघाच्या महिला वर्गाने स्वागतगीत सादर केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. मागील वर्षापासून यावर्षीपर्यंत ज्या ज्ञाती बंधू-भगिनींना देवाज्ञा झाली त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक चित्पावन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष गोविंद फडके यांनी केले. 2017 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले व सध्या केएलई विद्यापीठात कार्यरत असलेले मदन गोडबोले, बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक व 2022 चे एक्स्पोर्ट एक्सलन्स अवॉर्ड विजेते दिलीप चिटणीस आणि गुंतवणूक सल्लागार ‘माय अचिव्हमेंट’साठी निवड झालेले विजय भागवत यांचा त्यांच्या कार्यक्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. सर्व सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले.
कऱहाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष शिरीष कानेटकर यांनी गायत्री भवन, बेळगाव जिल्हा अखिल भारतीय ब्राह्मण समाज यांच्यावतीने मनोगत व्यक्त केले.
यानंतर गायक प्रसाद भट यांनी साथीदारांसह संगीत संध्या हा सदाबहार जुन्या व नव्या सुमधूर गीतांचा कार्यक्रम सादर केला. सूत्रसंचालन प्रा. अनघा वैद्य यांनी केले. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष विजयेंद्र गुडी यांनी आभार मानले.