रोमटामेळात कुडचडे-काकोडा शिमगोत्सव मंडळाला पहिले बक्षीस, पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई यांचा सत्कार
कुंकळ्ळी : पर्यटन खाते, कुंकळळी शिमगोत्सव समिती आणि कुंकळळी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुंकळ्ळीत आयोजित 26 व्या शिमगोत्सव मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रस्त्याच्या दुतर्फा मिरवणूक पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी उसळली होती. रोमटामेळ स्पर्धेत कुडचडे-काकोडा शिमगोत्सव मंडळाला, चित्ररथात त्रिवेणी कला संघ दुर्भाट-फोंडा यांना, तर लोकनृत्य स्पर्धेत सरस्वती कला मंडळ, कुर्टी यांना पहिली बक्षिसे मिळाली. रोमटामेळात दुसरे बक्षीस सुयोग शिमगोत्सव मंडळ आडपई, तिसरे खांडेपार शिमगोत्सव मंडळ खांडेपार, चौथे मांडलेश्वर शिमगोत्सव मंडळ फोंडा आणि पाचवे बक्षीस श्री पाईकदेव शिमगोत्सव मंडळ सांगे यांना मिळाले. चित्ररथात महालक्ष्मी नागरिक समिती यांना दुसरे बक्षीस, देव दांडेश्वर स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब नेवरा यांना तिसरे, भगवती कला संघ फोंडा यांना चौथे, तर आडपई युवक संघ फोंडा यांना पाचवे बक्षीस मिळाले. लोकनृत्यात दुसरे बक्षीस सिद्धिविनायक म्हालसा कला संघ म्हार्दोळ, तिसरे श्री नवदुर्गा कला व सांस्कृतिक मंडळ मडकई, चौथे विजया कला मंडळ कुर्टी-फोंडा व पाचवे बक्षीस सत्पुऊष कला मंडळ बार्से यांना मिळाले. वेशभूषा स्पर्धेत कनिष्ठ गटात पहिले आराध्य पागी, दुसरे श्रीनी संतोष कोटायगे व तिसरे बक्षीस भव्या शिरोडकरला, तर वरिष्ठ गटात धनंजय नाईक, निखील पालयेकर व शिवलिंग रमेश नाईक यांना अनुक्रमे प्रथम तीन बक्षिसे मिळाली. बक्षिसवितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, सन्माननीय पाहुणे म्हणून पर्यटन खात्याचे उपसंचालक राजेश काळे, कुंकळ्ळी नगराध्यक्ष डॉ. लक्ष्मण नाईक, पालिका अभियंता उदय देसाई तसेच शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष मंगलदास प्रभू, सचिव मनोज शिंदे, खजिनदार शंकर देसाई व इतर पदाधिकारी आणि नगरसेवक विशाल देसाई, उद्देश नाईक देसाई, रेमंड फर्नांडिस, जमिरा पिरीस, रेखा फर्नांडिस, पोलिता कारनेरो, रूपा गावकर, गौरी शेटकर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी कुंकळळीचे रहिवासी तथा मडगावचे पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई यांचा युरी आलेमाव व राजेश काळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना युरी आलेमाव यांनी उत्तम आयोजनाबद्दल शाबासकी दिली. सांस्कृतिक, क्रीडा आणि अन्य क्षेत्रांतही तरुणांनी भाग घ्यायला हवा. याकामी त्यांना आपले नेहमी सहकार्य राहील. कुंकळ्ळीत शिमगोत्सव मिरवणूक आयोजित करताना स्थानिक शिमगोत्सव समितीला व इतरांना सहभागी करून चांगला पायंडा पाडण्यात आला आहे. कुंकळ्ळीचा विकास निश्चित होईल आणि त्यास प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. उपअधीक्षक संतोष देसाई यांनी तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. अनेक कुंकळ्ळीवासीय चांगल्या हुद्यांवर पोहोचले आहेतच. त्याचबरोबर कुंकळ्ळीवासियांनी इतर क्षेत्रांतही नावलौकिक मिळवावा, असे आवाहन त्यांनी केले. नगराध्यक्ष डॉ. लक्ष्मण नाईक यांनी स्वागत केले व पाहुण्यांची ओळख करून दिली. महिलांने शिमगोत्सवाच्या स्पर्धा, कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी पुढाकार घ्यावा. कुंकळ्ळीतूनही चित्ररथ, रोमटामेळ पथक तयार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. मंगलदास प्रभू यांनी आभार मानले. कुंकळळीचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.