मनपा-रहदारी पोलिसांची कारवाई : मध्यवर्ती बसस्थानक ते संगोळ्ळी रायण्णा चौकापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानक व खडेबाजार रस्त्यावरील अतिक्रमणे आणि व्यावसायिकांना बाजूला हटविण्याची कारवाई दोन दिवसांपासून करण्यात येत आहे. यापाठोपाठ रहदारी पोलीस व महापालिकेने शुक्रवारी आपला मोर्चा मध्यवर्ती बसस्थानक ते आरटीओ कार्यालयापर्यंत वळविला. या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यासह रस्त्याशेजारी थाटलेली खोकी जप्त केली. मध्यवर्ती बसस्थानकात आल्यानंतर शहरात प्रवेश करण्यासाठी खडेबाजार रस्ता महत्त्वाचा आहे. पण या रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि बैठ्या विव्रेत्यांची संख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर जाहिरात फलक, दुकानांसमोर जम्प्स् लावले आहेत. त्यामुळे वाहतूक रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. याबाबत तक्रारी वाढल्याने रहदारी खाते आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने खडेबाजार रोडवरील अतिक्रमणे व अडथळे हटविण्याचा बडगा उगारण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही कारवाई राबविण्यात येत असून खडेबाजार रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्याची कारवाई केली आहे. तसेच खडेबाजार रस्त्यावरील अतिक्रमण रोखण्यासाठी रहदारी पोलिसांनी पेट्रोलिंग सुरू केले आहे. सलग तीन दिवस खडेबाजारमध्ये कारवाई केल्यानंतर शुक्रवारी आपला मोर्चा मध्यवर्ती बसस्थानक ते संगोळ्ळी रायण्णा चौकपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणाकडे वळविला. या मार्गावर असलेली अतिक्रमणे, जम्प्स् आणि खोकी हटविण्याची कारवाई केली. काही व्यावसायिकांनी रस्त्यावर खोकी थाटल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी केलेल्या कारवाईवेळी खोकी हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. यावेळी रहदारी पोलीस अधिकारी व महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सदर कारवाई केली.